

Traffic jam between Kolad and Indapur on Mumbai-Goa highway
कोलाड : विश्वास निकम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील कोलाड बाजापेठे ते इंदापूर दरम्यान गेली दहा ते बारा दिवसांपासून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना. या वाहतूक कोंडीमुळे मुंबई-गोवा हायवेवर वाहनांच्या ७ ते ८ किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रवासी वर्गाला यातून मार्ग काढतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
तर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते तसेच वाहतूक पोलिस तसेच सर्व मार्गांवरील रायगड पोलिस शर्थिचे प्रयत्न करीत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना पडलेल्या सुट्ट्या, लग्न सराई याचा आनंद घेण्यासाठी लाखो चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. परंतु कोलाड, इंदापूर ते माणगाव दरम्यान मुंबई-गोवा हायवेरील चौपदारीकरणाच्या अर्धवट कामामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना.
परंतु मे महिन्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी असंख्य चाकरमानी टुव्हीलर, फोर व्हिलर, एसटीबस, प्राव्हेट बस तसेच मिळेल त्या इतर वाहनाने कोकणात निघाले आहेत. परंतु अपुऱ्या रस्त्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असुन यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवासी वर्ग त्रस्त झाल्याचे दिसून आले.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षे सुरु आहे. परंतु या महामार्गवरील कोलाड, इंदापूर, माणगाव येथील बाजारपेठेतील अपुऱ्या रस्त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न तसाच आहे. परंतु याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला भोगावा लागत आहे.