

बारामती : बारामती शहरानजीक भाडोत्री खोलीत अल्पवयीन मुलीवर आम्रपाल सक्सेना (मूळ रा. ग्राम मिरकापूर, जि. हरदोई, उत्तरप्रदेश) याने शारीरिक अत्याचार केला. घटनेनंतर तो पळून जाण्याच्या तयारीत असताना बारामती तालुका पोलिसांनी त्याला अटक केली. (Latest Pune News)
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीचे कुटुंबसुद्धा उत्तर प्रदेश राज्यातील जोधपूर जिल्ह्यातील आहे. कामानिमित्त ते बारामतीत आले आहेत. पीडितेची आई व वडील हे दोघेही बारामती एमआयडीसीतील एका कंपनीत काम करतात. गुरुवारी (दि. 14) रोजी ते दोघे नेहमीप्रमाणे कामावर गेले. पीडिता घरासमोर खेळत होती. आरोपीने तिला खायला देतो असे सांगत त्याच्या घरात नेत तिच्यावर शारिरिक अत्याचार केला.
या प्रकारानंतर पीडितेची प्रकृती कमालीची बिघडली. ती घरात झोपून राहिली. रात्री आठच्या सुमारास तिची आई कंपनीतून कामावरून घरी आली असता मुलीची प्रकृती बरी नसल्याचे तिच्या लक्षात आले. मुलीकडे चौकशी केली असता मुलीने आम—पाल सक्सेना याने तिच्यासोबत केलेले घाणेरडे कृत्य आईला सांगितले. त्यानंतर या कुटुंबाने त्याच दिवशी रात्री उशिरा बारामती पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली.
बारामती एमआयडीसी परिसरातील चौधरवस्ती येथे एका आठवर्षीय मुलीवर झालेल्या शारीरिक अत्याचारप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. या मुलीसंबंधी घडलेल्या घटनेबद्दल पवार म्हणाले की, हे कुटुंब उत्तर प्रदेशातून कामधंद्याच्या निमित्ताने बारामतीत आले आहे. एकाने आठवर्षीय चिमुकलीसोबत घृणास्पद प्रकार केला. त्याची बातमी झाली तर शेवटी बदनामी बारामतीची होणार आहे. त्यामुळे असल्यांना सोडू नका. मी तर मागे म्हटले होते की, असल्या काहींचा असा बंदोबस्त केला पाहिजे की त्यांच्यात परत काही शिल्लकच राहिले नाही पाहिजे. त्यांचे असे करायचे धाडसच झाले नाही पाहिजे. आपण आता आरोपीवर कारवाई करतो आहे. पण, पालकांनी आपल्या मुला-मुलींना चांगली शिकवण द्यावी. वेडेवाकडे प्रकार कोणी करू नयेत.