

निमोणे : ‘तुमच्या गावातील रेणुका आणि विजय (दोन्ही नावे बदलली आहेत) एचआयव्हीग्रस्त आहेत. त्यांच्या जन्मलेल्या नवजात बाळालाही एड्स आहे. ते तिघेही एड्सबाधित आहेत. बाळंतपणाच्या तपासणीमध्ये हे उघड झाले. त्याचे रिपोर्ट डॉक्टरांनी सगळ्यात प्रथम मला सांगितले...’ ही बातमी वार्यासारखी गावात पसरली आणि तिला एड्स झाला त्या क्षणापासून त्या अभागी तीन जिवांची जी काही ससेहोलपट सुरू झाली ती कल्पनेपलिकडची आहे. (Pune Latest News)
शिरूर तालुक्यातील एका गावात 19-20 वर्षांचा तरुण सोशल मीडियावर चांगला सक्रिय होता. सोशल मीडियावरच तिची आणि त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर कधी प्रेमात झाले, हे त्यांचे त्यांनाही कळले नाही. दोघेही एक-दुसर्यात एवढे गुंतले की हे प्रेम लग्नाच्या मंडपापर्यंत जाऊन पोहचले. राजा-राणीचा संसार सुरू झाला. यथावकाश रेणुकाला दिवस गेले.
प्रेमविवाह असल्यामुळे माहेरचे संबंध तुटले होते. प्रसूती वेदनात चालू झाल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दोघांच्याही चेहर्यावर आनंद फुलला होता. बाळंतपणासाठी डॉक्टरांची लगबग सुरू झाली. ऑपरेशनपूर्वीच्या तपासण्या चालू झाल्या आणि अघटित समोर आले. तिच्या रक्तामध्ये एचआयव्ही संसर्ग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विजय आणि बाळाचेही रक्ताचे नमुने तपासले. त्यात या तिन्ही जिवांना रोगाने गाठल्याचे स्पष्ट झाले. काही क्षणात त्यांचे भावविश्व कोलमडून पडले.
डॉक्टरांनी त्यांना धीर दिला. वैद्यकीय शास्त्रामध्ये खूप प्रगती झाली आहे, औषधोपचार घ्या. सर्व काही ठीक होईल, असा सल्ला त्यांना देण्यात आला. दोघांचेही मनोबल वाढविण्याचा डॉक्टरांनी प्रामाणिक प्रयत्न केला आणि या धक्क्यातून ते थोडेबहुत सावरले. जे आपल्या नशिबात असेल ते होईल. आजचा दिवस आपला आहे. आपण जगून घेऊ, ही उमेद घेऊन ते गावी आले.
दुसरीकडे मात्र आपल्या आजाराचा गावभर बोभाटा झालाय, याची त्यांना कल्पनाही नव्हती. ज्यांच्याकडे आशेने पाहतोय वैद्यकीय विभागातील एका व्यक्तीने ते घरी पोहचायच्या आतच ही बातमी गावभर केली. त्यातून त्यांच्याकडे सर्वांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. आज ती ओली बाळांतीण असूनही तिलाच सारे काही करावे लागते. कोणी तिला विचारायला येत नाही. आजारपणाचे कळल्यानंतर त्यांनी ही हाय खाल्ली.
कालपर्यंत सोबत असलेले लोकही वाट वाकडी करू लागले आहेत. मिळालेल्या माहितीचे भांडवल करून काही मंडळी काहीही बोलू लागली आहे. त्यांना आपल्या बोलण्याने एखाद्याच्या आयुष्याची किती वाताहत होत आहे, याची थोडीही जाण नाही. आज सगळ्या आजारांवर औषध आहे. फक्त लोकांच्या स्वभावावर नाही. अत्याधुनिक उपचारांकडे दुर्लक्ष करीत ही मंडळी गावभर आपल्या जुन्या विचारांचे आणि अडाणीपणाचे सर्रासपणे दर्शन घडवत आहेत. त्यामुळे मात्र या तीन जिवांना नाहक यातनांना सामोरे जावे लागत आहे.