

शिवाजी शिंदे
पुणे : राज्यातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांच्या पाणी दरात तिप्पट वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे उद्योगांना वर्षाला सुमारे 93 कोटी 30 लाख रुपये वर्षाला भरावे लागणार आहेत. या वाढलेल्या पाण्याच्या दरामुळे उद्योगांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
राज्यात सर्व भागात मिळून सुमारे 289 औद्योगिक वसाहती (एम.आय.डी.सी.) आहेत. या वसाहतीमध्ये लहान, मध्यम आणि मोठे असे मिळून अंदाजे 64 लाख 76 हजारांच्या आसपास उद्योगधंदे आहेत. या सर्व वसाहतींना वर्षाला सुमारे 22 टी.एम.सी. (अब्ज घनफूट) म्हणजेच 37 टक्के पाण्याचा वापर होत असतो. वसाहतीना पुरविण्यात येणा-या पाण्यासाठी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामार्फत पाण्याचे दर वाढविण्यात येत असतात.तर एम.आय.डी.सी. मार्फत जलसंपदा विभागाकडून या वसाहतींना पाणी पुरवठा करण्यात येतो.
त्यानुसार या वसाहतीमधील उद्योगधंद्यांना एक हजार लिटर पाण्यासाठी 4 रूपये 40 पैसे दर होता. या दरात सुमारे दहा वर्षाहून अधिक काळ कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र सष्टेंबर महिन्यापासून उद्योजकांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक एक हजार प्रति लिटर मागे 15 रूपये दर वाढ करण्यात आली. म्हणजेच पूर्वी 22 टीएमसीला एक हजार लिटर पाण्यामागे 4 रूपये 50 पैसे दराने वर्षाकाठी 27 कोटी 99 लाख रूपयांची पाणीपट्टी भरण्यात येत होती. त्यामध्ये 15 रूपये प्रति एक हजार लिटर मागे वाढ केल्यामुळे ही वाढा तिप्पट झाली आहे. या वाढीव दरवाढीमुळे आता उद्योजकांना वर्षाकाठी तिप्पट म्हणजेच 93 कोटीहून अधिक रक्कम पाणीपट्टीच्या बदल्यात मोजावी लागणार आहे.
या वाढलेल्या तिप्पट पाणीपट्टीचा जोराचा फटका राज्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत असलेल्या उद्योगांना बसला आहे. अगोदरच गेल्या काही वर्षापासून वाढलेल्या वीजेच्या दरामुळे उद्योग हैराण झाले आहेत. त्यात आता पाण्याच्या दरात तिप्पट वाढ केल्यामुळे अतिरिक्त वाढलेले पाण्याचे बील भरायचे की वाढलेले वीजबील या कचाट्यात औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक सापडले आहेत.
पूर्वीचे दर सध्याचे वाढलेले दर
4 रूपये 50 पैसे 15 रूपये (तिप्पट दरवाढ)
एका लिटरला पूर्वी 4 रूपये 50 पैसे होता दर त्यात वाढ होऊन सध्याचा वाढलेला दर 15 रूपये
-पुणे : - चाकण, तळेगाव, पिरंगुट,राजणगाव,हडपसर, भोसरी, पिंपरी, बारामती, हिंजवडी, तडवळे, पुणे शहर
-नाशिक : अंबड, सातपूर
-छतपती संभाजीनगर : वाळुंज, शेंद्रे, चिकलठाणा
-नागपूर : बुटीबोरी
-मुंबई महानगर क्षेत्र : ठाणे, कल्याण, डोंबिवली, तळोजा, अंधेरी,महापे, मटोल,
-सोलापूर,कोल्हापूर,सातारा, सांगली, रत्नागिरी,रायगड, नांदेड आदि
एमआयडीसी ने वाढविलेले पाण्याचे दर अवास्तव असून, ही दरवाढ उद्योगांवर अन्याय करणारी आहे. एमआयडीसीने उद्योगांना विचारात न घेता व विश्वासात न घेता तीन ते चार पटीने अचानक वाढविला आहे. याचा विपरीत परिणाम उद्योगांवर होणार आहे. एमआयडीसी कडून होत असलेल्या या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार असून, हा जीझीया कर कमी करण्यासाठी आग्रही भूमिका घेणार आहोत.
दिलीप बटवाल ,मुख्य कार्यकारी अधिकारी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज