

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय सुरू केलेल्या जनसंवाद कार्यक्रमामुळे महापालिका अधिकाऱ्यांची चांगलीच धावाधाव सुरू झाली आहे. खडकवासला मतदारसंघातील जनसंवाद कार्यक्रमापूर्वीच या मतदारसंघातील धायरीसह परिसरातील रस्त्यांची दुरुस्तीची कामे भरपावसात सुरू करण्यात आली आहेत.
पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली असल्याचे समोर आले आहे. त्यातच उपमुख्यमंत्र्यांनी आता विधानसभा मतदारसंघनिहाय जनसंवाद कार्यक्रम सुरू केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी या स्वरूपांच्या तक्रारींचा सर्वाधिक समावेश आहे. (Latest Pune News)
या सर्व सोयी-सुविधांची जबाबदारी महापालिकेवर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्र्यांसमवेत जनसंवाद कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडते.
हडपसर येथील जनसंवाद कार्यक्रमात त्याचे प्रतिबंब उमटले होते. त्यामुळे आता खडकवासला मतदारसंघात आज बुधवारी हा जनसंवाद कार्यक्रम नियोजित असल्यामुळे त्यात नागरिकांच्या तक्रारी रोखण्यासाठी प्रशासनाकडून गेल्या चार-पाच दिवसांपासून मोठी धावपळ सुरू आहे. त्यामुळे या भागातील रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा कशी कामे मार्गी लावण्याचे काम जोरात सुरू असल्याचे चित्र आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त परिस्थितीमुळे सर्व कार्यक्रम रद्द केल्याने खडकवासला मतदारसंघातील 24 सप्टेंबर रोजीचा नियोजित जनसंवाद कार्यक्रम आणि 25 सप्टेंबर रोजी होणारा राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाला आणखी काही अवधी मिळाला आहे.