म्हाळुंगे येथील म्हाडाच्या घरांची विक्री रखडली

म्हाळुंगे येथील म्हाडाच्या घरांची विक्री रखडली
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुणे म्हाडाच्या वतीने विक्रीसाठी तयार असलेल्या आपल्या चाकण आणि म्हाळुंगे इंगळे येथील इमारती कोविड केअर सेंटरसाठी तातडीने उपलब्ध करून दिल्या. कोरोनाच्या पहिल्या व दुस-या लाटेमध्ये या कोविड केअर सेंटरसाठी वापरलेल्या इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

कोविड केअर सेंटर बंद झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने म्हाडाच्या घरांची दुरुस्ती करून देणे अपेक्षित होते. या घरांच्या दुरुस्तीचे पैसे कोणी द्यायचे यावरून जिल्हा प्रशासनामध्ये फाईलची टोलवाटोलवी सुरू आहे; परंतु यामुळे गेले दोन वर्षांपासून म्हाडाची घरांची विक्री रखडली आहे.

कोविड केअर सेंटरसाठी ग्रामीण क्षेत्रात चाकणजवळील महाळुंगे इंगळे येथे मोठे सेंटर सुरू केले. म्हाडाच्या अद्ययावत इमारती त्यासाठी देण्यात आले. काही महिने येथे कोविड सेंटर कार्यरत होते. या दरम्यान म्हाडाच्या नव्या फ्लॅटचे नुकसान झाले. दरवाजे मोडले, खिडक्या तुटल्या, स्वच्छतागृह, बाथरूममध्ये देखील दुरुस्तीची गरज आहे. रंगरंगोटी करणे देखील आवश्यक असून त्याशिवाय या इमारतींमधील म्हाडाची घरे विक्री थांबवावी लागली आहे.

म्हाळुंगे येथील कोविड केअर सेंटर हे जिल्हा परिषदेमार्फत चालवण्यात येत होते; परंतु या सेंटरच्या खर्च संदर्भातील सर्व कार्यवाही जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून होत होती. या सेंटरवर पूर्णपणे जिल्हाधिकारी यांचे नियंत्रण होते. म्हाडाने या इमारतींच्या दुरुस्तीसाठी सुमारे दोन कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला होता. जिल्हा परिषदेने तो जिल्हाधिकार्‍यांकडे शिफारस करून पाठवला आहे; परंतु गेले काही दिवस या प्रस्तावावर कोणताही निर्णय झाला नाही. परिणामी, म्हाडाच्या इमारतीचे फ्लॅट दुरुस्तीअभावी पडून असल्याने घरांची विक्रीदेखील थांबली आहे.

अधिकार्‍यांनी साधली चुप्पी
इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये कोणत्या यंत्रणेकडून द्यायचे याबद्दल निर्णय झालेला नाही. साथ रोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ताब्यात घेतलेल्या इमारती तसेच जागा यांचे संपूर्ण भाडे आणि अनुषंगिक खर्च हा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कक्षेतील ही बाब असली तरी याबद्दल कोणतेही अधिकारी बोलण्यास तयार नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news