भिलारेवाडी वन विभागात वैद्यकीय कचरा; पर्यावरण व वन्यजीवांना धोका

भिलारेवाडी वन विभागात वैद्यकीय कचरा; पर्यावरण व वन्यजीवांना धोका

कात्रज : पुढारी वृत्तसेवा : कात्रज जुन्या घाटात भिलारेवाडी वन विभाग क्षेत्रामध्ये रात्रीच्या वेळी कचरा, राडारोडा टाकला जात आहे. त्यातच आता या ठिकाणी वैद्यकीय कचरा टाकला जात असल्याने वन्यजीवांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत वन्यजीवप्रेमींनी चिंता व्यक्त केली असून, या ठिकाणी कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कात्रज घाटामध्ये वन विभाग क्षेत्रात रस्त्याच्या बाजूला, तसेच झाडाझुडपांमध्ये मुदत संपलेली इंजेक्शन, सुई, रक्त व लघवी यांचे सॅम्पल असलेल्या डब्या, औषधांच्या बाटल्यांसह इतर जैववैद्यकीय कचरा टाकण्यात येत आहे.

घाटातील अर्धा किलोमीटर रस्त्याच्या बाजूने वन विभागाच्या हद्दीत रात्री गाड्यांमधून भरून आणून हा कचरा टाकला जात असावा, असा संशय आहे. तसेच, हा कचरा पुणे शहर किंवा उपनगरांतील रक्त, लघवी तपासणी केंद्रांतील असण्याची शक्यता आहे. हा कचरा उघड्यावर पडल्याने वन्यजीवांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. एका पक्षिप्रेमी व्यक्तीचा याबाबतचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत हा जैववैद्यकीय कचरा उचलला गेला. मात्र, अजूनही मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. या ठिकाणी जैववैद्यकीय कचरा टाकणार्‍यांवर वन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी पक्षी व पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

कात्रज घाटामध्ये टाकण्यात आलेला जैववैद्यकीय कचरा उचलण्यात आला आहे. हा कचरा कोणत्या रक्त, लघवी तपासणी संस्था अथवा दवाखान्याने टाकला याबाबतचा तपास सुरू असून, लवकरच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

-राजेश गुर्रम, सहायक आयुक्त, धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय

कात्रज घाट वन विभागाच्या हद्दीत जैववैद्यकीय कचरा टाकणार्‍यांचा तपास करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कचरा टाकला जात असलेल्या ठिकाणी कर्मचार्‍यांची गस्त वाढविण्यात येणार आहे. तसेच, या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत वरिष्ठांना लवकरच कळविण्यात येईल.

-विशाल यादव, वनपाल, खेड शिवापूर वनपरिक्षेत्र

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news