व्यवस्थेविरुद्धच्या संघर्षातून पत्रकारांनी पळ काढू नये : ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर | पुढारी

व्यवस्थेविरुद्धच्या संघर्षातून पत्रकारांनी पळ काढू नये : ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पत्रकारितेसमोर आज अनेक आव्हाने असून, पत्रकारांवर दडपण आणले जात आहे. पत्रकारितेत वेगवेगळ्या नव्या श्रेण्या प्रचलित झाल्या आहेत. आता व्यवस्थेविरुद्ध लिखाण करणारा पत्रकार म्हणजे देशद्रोही अशा प्रकारच्या वर्गवार्‍याही केल्या जातात. आपल्या लोकशाही देशात अशाप्रकारे वर्गवारी होणे चुकीचे आहे. थेट सामान्यांपर्यंत पोहोचणे हे पत्रकाराचे काम असते. जेव्हा पत्रकार सामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवतो तेव्हा त्याचा व्यवस्थेशी संघर्ष अटळ असतो. मात्र, अशावेळी पत्रकारांनी या संघर्षातून पळ काढू नये, त्याला सामोरे जावे, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर यांनी व्यक्त केले.

पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळातर्फे देण्यात येणार्‍या वरुणराज भिडे स्मृती पुरस्काराचे वितरण रविवारी अनंत बागाईतकर आणि पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी अध्यक्षपदावरून बागाईतकर बोलत होते. पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल समर खडस, शैलेश काळे, डी. के. वळसे पाटील, अरुण म्हेत्रे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) प्रवक्ते अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई, जयराम देसाई आदी उपस्थित होते.

बागाईतकर म्हणाले, वस्तूनिष्ठ आणि सोप्या शब्दांत मांडलेली बातमी कोणीही दाबू किंवा नाकारू शकत नाही. पत्रकार हा जागता असला पाहिजे. प्रवाहासोबत राहायचे की प्रवाहाविरुद्ध जायचे हे पत्रकाराने ठरविले पाहिजे. सध्याच्या पत्रकारितेत तंत्रज्ञानाचे आक्रमण वाढत आहे. तंत्रज्ञान पत्रकारितेवर वरचढ होऊ नये. डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, सध्या पत्रकारितेसमोर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचे आव्हान वाढत असून, त्यातून समाजात गैरसमज निर्माण केले जात आहेत. पत्रकारांनी या आव्हानांचा सामना करताना संयम बाळगून वस्तूनिष्ठ गोष्टी सामान्य जनतेपर्यंत पोहचवल्या पाहिजे. आज अधिकाधिक लोक माहिती मिळवण्यासाठी वृत्तपत्रांवर अवलंबून आहेत. म्हणूनच वृत्तपत्रांचे महत्त्व आजही टिकून आहे. ते कधीही कमी होणार नाही. आताच्या द्वेषाच्या वातावरणात पत्रकारांना काम करावे लागत असून, अशावेळी पत्रकारांनी जागृत राहणे गरजेचे आहे, असे मत खडस यांनी व्यक्त केले. डॉ. शैलेश गुजर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश भोंडे यांनी आभार मानले.

गेल्या काही वर्षांत पत्रकारितेत विधायक किंवा सकारात्मक पत्रकारितेचा प्रवाह आला आहे. अनेक पत्रकार तसे लिखाणही करत आहेत. पत्रकारांचे काम हे कौतुक करणे नाही तर जे काही समोर दिसते त्या त्रुटी आणि सत्य परिस्थिती शोधून ते समाजासमोर मांडणे, हे पत्रकाराचे कर्तव्य आहे.

-अनंत बागाईतकर, ज्येष्ठ पत्रकार

हेही वाचा

Back to top button