

सुनील माळी
मेधाताई, पुण्यातील कोथरूडच्या एका मैदानावर स्पीकरच्या भिंती उभारून कान फुटतील एवढ्या कर्कश्य स्वरांत डीजे नामक यंत्रणा धिंगाणा घालत असल्याची तक्रार आल्यावर तुम्ही तातडीने गाडी तिकडं वळवली अन गरब्याच्या नावावर सुरू असलेला तो भयावह प्रकार बंद पाडलात... यावर तुमच्या स्वपक्षीयांच्या अन विरोधकांच्याही काय यायच्या त्या प्रतिक्रिया आल्या असतील-नसतील..., पण सामान्य पुणेकरांची प्रतिक्रिया एकच येईल... 'संधिसाधू अन बोटचेप्या राजकारण्यांसारखं तुम्ही वागला नाहीत... हेच तर तुमचे वेगळेपण आहे, मेधाताई...,'
सणसमारंभांना, धार्मिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांना विकृत वळण येतं आहे, नव्हे ते येऊन बराच काळही लोटला आहे. या सणांच्या नावाखाली दिवसोंदिवस रस्ते अडवणे, तारस्वरात स्पीकर प्रदीर्घ काळपर्यंत चालू ठेवून त्यावर नाचत राहणं या प्रकारांच्या विरोधात बोलणाऱ्यांची संख्या आधीच खूप थोडी.
त्यात त्या फुटकळ सामाजिक कार्यकर्त्यांच्या-संस्थांच्या बोलण्याकडं कुणीच गंभीरपणानं पाहात नाही, अगदी कायदेपालनाची ज्यांची जबाबदारी त्या प्रशासनाकडूनही त्यांची दखल घेतली जात नाही. कुणी फारच जोरात टीका करू लागला तर '' 'आमच्या' सणांच्याच रितीरिवाजांना विरोध का, 'त्यांच्या' सणांना विरोध का नाही करत तुम्ही ?'', अशी चढाई होते.
'विकृतीचा कळस गाठणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना का दुखवायचं ?, पुढच्या निवडणुकीतली आमची मतं जातील', असं म्हणत लोकप्रतिनिधी बोटचेपेपणाची भूमिका घेतात. तुम्ही ज्या पक्षाचं प्रतिनिधीत्व करता तो भारतीय जनता पक्षही 'संस्कृती फस्ट' असं म्हणून धर्माधिष्ठित राजकारण करण्यात पटाईत. तरीही या कशाचीच पर्वा न करता तुम्ही सामान्य नागरिकांची बाजू घेतली... हेच तर तुमचं वेगळेपण आहे मेधाताई...
मेधाताई, तुम्हाला आलेला अनुभव तुमच्याच शब्दांत तुम्ही मांडला. तुम्ही नवरात्रीच्या आरत्यांच्या कार्यक्रमांमध्ये एका मंडळामधून दुसऱ्या मंडळाकडे जाण्यात गर्क होतात. त्यावेळी तुम्हाला एका मैदानावर असह्य होईल, अशा आवाजात गरबा साजरा होतो आहे, हे समजलं. तुम्ही गाडी तातडीनं त्या मैदानाकडं वळवली आणि तुम्ही आल्यावर तुम्हाला जे दिसलं त्यानं तुम्हाला खूपच धक्का बसल्याचं तुम्ही सांगता.
'नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासनं या मैदानावर मोठ्ठ्या आवाजात स्पीकर लावण्यात आला होता आणि या मैदानाच्या आजूबाजूला राहणाऱ्या पुणेकरांना त्या अनेको तास चालणाऱ्या आवाजाचा त्रास होत होता.' असं या तक्रारीचं स्वरूप होतं. त्या पुणेकरांनी यंत्रणांकडं धाव घेतली. पीआय म्हणजेच पोलिस निरीक्षक, डीसीपी म्हणजे उपायुक्त, सीपी म्हणजे आयुक्त या चढत्या क्रमानं त्यांनी न्यायाची मागणी केली.
पण 'सद् रक्षणाय खलनिग्रहणाय' म्हणजेच 'सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवणे', हे ब्रीद आपल्या कपाळावर घेऊन फिरणाऱ्या पोलिस दलाने 'आवाज कमी करायला सांगतो', हा उत्तरापलिकडे काहीच हालचाल केली नाही. या तक्रार करणाऱ्या स्थानिक पुणेकर रहिवाशांमध्ये कर्करोगाच्या रूग्णांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंतचे सर्व जण होते. त्यांच्या घराच्या खिडक्या-दारे आवाजाच्या तीव्रतेनं थडाथड उडत असल्याचं तुम्ही पाहिलं.
नगरसेवकापासून ते शहराचं प्रतिनिधीत्व दिल्ली-मुंबईत करणारे अनेक बनचुके लोकप्रतिनिधी या पुण्यानं पाहिलेत. कुणाचाच वाईटपणा घ्यायचा नाही, गुळमुळीत भूमिका घेत सर्वच घटकांची मतं सांभाळून कातडी बचाव धोरण घ्यायचं, या पद्धतीनं वागणाऱ्या लोकप्रतिनिधींचाच इथं सुळसुळाट. तशा बनचुकेपणाचा अनुभव कोथरूडच्या रहिवाशांना आला नाही.
हा धिंगाणा पाहून कोणत्याही संवेदनशील पुणेकराच्या कपाळावरची शीर ताडताड उडली असती. तशी तुमच्या कपाळीची शीर उडली अन ''धार्मिक सण-उत्सवांचे विकृत रूप का दाखवता आहात ? मी स्वत: धर्मासाठी काम करणारी व्यक्ती आहे, पण हिंदू धर्माचे विडंबन करणारे असे कार्यक्रम योग्य नाहीत. तरूणाईला नासवण्याचे काम सुरू आहे, तरूणांनी उठून देशासाठी काम केलं पाहिजे, रोजगारक्षम होण्याची तयारी केली पाहिजे, मात्र त्यांचा वेळ अशा कार्यक्रमांत वाया घालवला जातो आहे, नियमांचे पालन न होणारे असे कार्यक्रम थांबवले पाहिजेत,'' अशा संतप्त स्वरांत तुम्ही हजेरी घेतली, हेच तर तुमचं वेगळेपण मेधाताई...
'आम्ही नियमांचं पालन करूनच कार्यक्रम करत होतो', असं प्रतिपादन आयोजकांनी केल्याचं प्रसिद्ध झालं आहे. त्याबाबत चर्चा करताही येईल, पण खरी चर्चा करायची गरज आहे ती तुम्ही केलेल्या जनआंदोलनाच्या घोषणेची.
सर्वात महत्त्वाचं आहे ते जनहित आणि 'अशा घांगडधिंग्याला आळा घालण्यासाठी आपण जनआंदोलन उभारणार आहोत', अशी घोषणा तुम्ही केलीत. अरे बापरे... ताई, ही घोषणा तुम्ही प्रत्यक्षात आणायचं ठरवलं तर तुमचं काम खूपच वाढेल हो... गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत रात्री टिळक रस्त्यानं तुम्ही कधी गेलात का ताई ?... डीजे अन स्पीकर नुसते कानच बधिर करून टाकत नाहीत तर हृदयाचे ठोके चुकतील, असा आवाज रात्री बारापर्यंत अन त्यानंतर पहाटे सहानंतर दुपारपर्यंत सुरू असतो.
तुम्ही हे जनआंदोलन सुरू केलं ना ताई, की त्या रस्त्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा अन तिथल्या रूग्णालयांत दाखल असलेल्या रूग्णांचा छळही तुमच्यापर्यंत आपोआपच पोहोचेल. गणेशोत्सवात रस्ता व्यापणारे टाकलेले मांडव नवरात्रीपर्यंत तसेच ठेवण्याची प्रथा अनेक ठिकाणी आताआतापर्यंत पाळली जात होती.
वाहनांच्या महामूर संख्येमुळं आधीच झालेल्या वाहतूक कोंडीत या मांडवांमुळं पडलेली भर निमूटपणं सहन करणारे सोशिक वाहनचालक पुणेकर तुम्हाला दिसू लागतील...
गणेशोत्सवाच्या बराच काळ आधीपासून तासनतास चालत असलेल्या ढोल-ताशांच्या सरावानं आजूबाजूच्या पुणेकर रहिवाशांची स्थिती काय होते, तेही समोर येत जाईल...
त्यामुळंच ताई, तुमच्या वेगळेपणाची एक झलक परवाच्या प्रकारामुळं दिसली, तसाच अनुभव पुन:पुन्हा घेण्यासाठी पुणेकर आसुसले आहेत. त्यामुळंच तुम्ही तुमच्या घोषणेप्रमाणं जनआंदोलन उभाराच. सगळ्या शहराचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या खासदाराचं जनआंदोलन तुमचं हे वेगळेपण आणखी गडद-ठळक करत जाईल.... ताई...