पिंपरी : महापालिकेतर्फे बालकांसाठी गोवर रूबेला लसीकरण

पिंपरी : महापालिकेतर्फे बालकांसाठी गोवर रूबेला लसीकरण

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : अर्धवट लसीकरण झालेले व लसीकरण न झालेली शून्य ते 5 वर्षांचे बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात, असे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून आढळून आले आहे. त्यासाठी शहरात या बालकांसाठी गोवर रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम 7 ऑगस्ट ते 14 ऑक्टोबरपर्यंत तीन टप्प्यात राबविली जाणार आहे, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी बुधवारी (दि.19) सांगितले.

या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालकांचे व गरोदर माता यांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या विशेष मिशन इंद्रधनुष मोहीमची पहिली फेरी 7 ते 12 ऑगस्ट, दुसरी फेरी 11 ते 16 सप्टेंबर आणि तिसरी फेरी 9 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण शहरात राबविण्यात येणार आहे.

त्यासंदर्भात महापालिकेचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, पीएचएन, सीनिअर एएनएम, एएनएम व आशा स्वयंसेविका यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. क्षेत्रीय आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांची माहिती 17 ते 22 जुलै या कालावधीत घेत आहेत.

बालकांचे लसीकरण करून घ्या

शहरातील शून्य ते 5 वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण झाले नसल्यास नागरिकांनी आपल्या घराजवळील महापालिकेच्या रुग्णालय किंवा दवाखान्यात जाऊन बालकांचे मोफत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. गोफणे यांनी केले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news