पिरंगुट: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शनिवारी आणि रविवारी मुळशी तालुक्यामध्ये पावसाचा आनंद घेण्यासाठी येत असाल तर सावधान. इकडे प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे, असे मेसेज मुळशीकरांना सोशल मीडियावर टाकावे लागत आहेत.
पिरंगुट येथे ओढ्यावरील पुलाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. परंतु, दोन्ही बाजूला जिथे पूल जमिनीला जोडला जातो तेथे ठेकेदाराने अर्धवट मुरूम टाकल्यामुळे रविवारी (दि.15) दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. (Latest Pune News)
वाहनचालकांच्या बेशिस्तपणाच्या सवयींमुळे सुद्धा वाहतूक कोंडीत भर पडत होती. दोन किलोमीटर अंतर जाण्यासाठी अवघे पाच ते सात मिनिटे लागतात. तेथे रविवारी एक ते दीड तास लागत होता. एवढी मोठी वाहतूक कोंडी पिरंगुट येथे झाली होती.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुळशी तालुक्यामध्ये सकाळपासून पुण्यातून पर्यटक यायला सुरुवात होते तसेच रात्री जाताना सुद्धा पिरंगुट, घोटवडे फाटा, लवळे फाटा, माताळवाडी फाटा, भुगाव या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत असते.
बावधन पोलिस तसेच पौड पोलिस ही वाहतूक कोंडी सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. परंतु, काही बेशिस्त वाहन चालकांमुळे इतर वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागले.
20 किमी अंतरासाठी दीड ते दोन तासांचा वेळ
चांदणी चौक ते पौड हे 20 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दोन ते अडीच तास वेळ लागत आहे. यावर एकच पर्याय म्हणजे चांदणी चौक ते पौड चारपदरी रस्ता करणे तसेच त्या रस्त्याला जोडूनच सेवा रस्ता करणे. म्हणजे कोकण तसेच मुळशीकडे जाणार्या पर्यटकांना मधल्या रस्त्याने सरळ जाता येईल आणि स्थानिक नागरिकांना सेवा रस्त्याने जाता येईल.
कोंडीचा स्थानिकांसह हॉटेल व्यावसायिकांनाही फटका
या वाहतूक कोंडीचा स्थानिक नागरिकांनाही मोठा फटका बसतो. किरकोळ कामासाठी घरा बाहेर पडले तरी दोन दोन तास त्या वाहतूक कोंडीमध्ये अडकून बसावे लागते. या वाहतूक कोंडीमुळे भुगाव, भुकूम परिसरातील अनेक हॉटेल व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला आहे.