पुणे- पुणे आणि आसपासचा परिसर पावसाळ्यात हिरवागार होऊन नयनरम्य बनतो. ओढे, धबधबे, धरणे आणि थंड हवेची ठिकाणे पर्यटकांना भुरळ घालतात. हिरव्यागार वनराईने भरलेली दिसतात. मात्र, यांना भुरळून न जाता पर्यटन करताना पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.
असे अनुभवी ट्रेकर आणि दुर्ग भ्रमंतीकार सांगतात. पावसाळी पर्यटनासाठी पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील इंदुरी येथील कुंडमळा येथे पर्यटनासाठी गेलेल्या काही पर्यटकांचा पूल तुटल्यामुळे वाहनांसामावेत पाण्यात वाहून मृत्यू झाला. (Latest Pune News)
त्या पार्श्वभूमीवर पावसाळी पर्यटनाला निघताना पर्यटकांनी काय काळजी घ्यायला हवी आणि प्रशासनाने त्याबाबत कोणकोणते उपाययोजना करायला हव्यात या संदर्भात शहरातील अनुभवी ट्रेकर आणि दुर्गभ्रमंतीकार यांच्याशी दैनिक ’पुढारी’च्या प्रतिनिधीने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पावसाळी पर्यटनामुळे पर्यटकांच्या जीवाशी असलेले धोके आणि त्यासंदर्भात काय काळजी घ्यायला हवी, याबाबत सविस्तर माहिती दिली.
सुरक्षिततेसाठी ही घ्या खबरदारी..
रस्ते निसरडे होणे,भूस्खलन, नद्या-नाल्यांना पूर,दाट धुके आणि वन्यजीवांचा धोकाहे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
पर्यटकांनी प्रवासाला निघण्यापूर्वीहवामानाची माहिती घेणे,सुरक्षित ठिकाणी प्रवास करणेआणिनिसरड्या रस्त्यांवर सावकाश वाहन चालवणे
योग्य कपडे आणिपादत्राणेवापरणे
प्रथमोपचार किटसोबत ठेवणे
वाहत्या पाण्यात उतरणे टाळणेमहत्त्वाचे आहे. अनावश्यक धाडस करणे टाळावे
सेल्फी काढताना धोकादायक ठिकाणी जाऊ नये.
प्रशासनाने या उपाययोजना कराव्यात
प्रमुख पर्यटनस्थळांवर सूचना फलक लावणे
मार्गदर्शकांची नियुक्ती करणे आपत्कालीन सेवा सज्ज ठेवणे
रस्त्यांची दुरुस्ती करणे आणि जनजागृती मोहीम राबवणे
काही ठिकाणी जास्त धोका असल्यास तात्पुरते प्रवेश निर्बंधही लावावेत.
धोकादायक ठिकाणी पोलिस आणि वन विभागाकडून गस्त घालणे.
पुणे परिसरातील पावसाळी पर्यटनस्थळे...
लोणावळा-खंडाळा, सिंहगड किल्ला, ताम्हिणी घाट, वरंधा घाट, राजमाची किल्ला, राजगड, तोरणा गड आणि दारवली धबधबा ही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत, यासह अन्य छोटी मोठी पावसाळी पर्यटन स्थळेही पुण्यात आहेत, जी पावसाळ्यात विशेष आकर्षक दिसतात.
आमची दरवर्षी पावसाळ्यात पावनखिंडसाठी ट्रेक निघते. मी राज्यातील आणि राज्याबाहेरील 100 पेक्षा अधिक गडकिल्ले फिरलो आहे आणि अजूनही वेळ मिळाल्यास मी गडकिल्ल्यांच्या पर्यटनासाठी बाहेर पडतो. पर्यटन करणं खूप चांगली गोष्ट आहे, मात्र पर्यटन करताना प्रशासनाच्या आवश्यक त्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं तितकंच गरजेचं आहे. विशेषतः पावसाळी पर्यटन करताना पर्यटकांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे.
-राहुल नलावडे, सदस्य, गड किल्ले संवर्धन समिती, महाराष्ट्र शासन (दुर्गअभ्यासक)
आम्ही 700 ते 800 ठिकाणी ट्रेकिंग केली आहे आणि ऊन, पाऊस, वारा अशा तिन्ही ऋतूंमध्ये वेळ मिळेल तेव्हा ट्रेकिंगला जातो. भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अनेक ठिकाणी आम्ही ट्रेक केले आहेत. ट्रेकिंग करणे खूप चांगले आहे, पण त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणेही तितकंच महत्त्वाचे आहे. विशेषतः पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बाहेर पडताना खूप काळजी घ्यायला हवी, अन्यथा जीवावर बेतू शकते.
- नितीन चव्हाण आणि श्रीरंग राहींज, अनुभवी ट्रेकर्स