

कोरेगाव भीमा: चुलत सासरे आणि त्यांचा नातू याने मालमत्तेच्या वाटणीवरून केलेल्या छळाला कंटाळून शिरसवाडी येथे विवाहितेने वटपौर्णिमेच्या दिवशीच मंगळवारी (दि. 10) गळफास घेऊन आत्महत्या केली. या विवाहितेचे नाव मोहिनी सुक्रे (वय 28, मूळ रा. सुक्रेवाडी केंदूर, ता. शिरूर, सध्या रा. अंधेरी पश्चिम, मुंबई) असे आहे.
मोहिनी यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीनुसार चुलत सासरे दगडू नानाभाऊ सुक्रे व त्यांचा नातू भानुदास ऊर्फ विवेक सुक्रे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत मोहिनी यांचे पती योगेश सुक्रे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. 14) तक्रार दाखल केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिनी यांनी त्यांच्या माहेरी मुरकुटेनगर शिरसवडी (ता. हवेली) येथे वटपौर्णिमेच्या दिवशी मंगळवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चुलत सासरे दगडू सुक्रे व त्यांचा नातू भानुदास ऊर्फ विवेक सुक्रे या दोघांनी मालमत्तेच्या वाटणीवरून वेळोवेळी दिलेल्या धमकीमुळे, त्रासामुळे कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे.
या दोघांना कोणतीही माफी न देता त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती केली आहे. आपला मुलगा यश याची पती योगेश सुक्रे यांनी काळजी घ्यावी, असे कळकळीने या चिठ्ठीत मोहिनी यांनी नमूद केले आहे. दरम्यान माझ्या पत्नीच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या आरोपींना पोलिसांनी त्वरित अटक करून न्यायालयाने त्यांना कायदेशीर कठोर शिक्षा करावी, अशी मागणी पती योगेश सुक्रे यांनी केली आहे.
आम्ही या घटनेप्रकरणी शनिवारी (दि. 14) गुन्हा दाखल केला. रविवारी (दि. 15) सकाळच्या सुमारास आरोपींना अटक करण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी सुक्रेवाडी केंदूर येथे पोलिस अधिकारी गेले असता आरोपी फरार झाले होते. त्यांचा कसून तपास सुरू असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.
- सर्जेराव कुंभार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलिस ठाणे