वाल्हे: साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा दसरा आणि झेंडूची फुले यांचे नाते पूर्वापार चालत आलेले आहे. खंडेनवमी आणि दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. मागील वर्षी पुरंदर तालुक्यातील फुल उत्पादकांना नवरात्रोत्सव, दसरा यादरम्यान झेंडू फुलांना प्रतिकिलो 100 ते 120 रुपये भाव मिळाला. यावर्षीही अधिकचा बाजारभाव मिळेल, अशी आशा फुल उत्पादकांना आहे.
पुरंदर तालुक्यात झेंडू फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी झेंडूच्या लागवडक्षेत्रात वाढ झाली आहे. 156.5 हेक्टर क्षेत्रात झेंडूची लागवड झाली आहे. मागील वर्षी 139.2 हेक्टर क्षेत्रात झेंडूची लागवड झाली होती. (Latest Pune News)
पुरंदर तालुक्यात यंदा झेंडूचे उत्पादन चांगले आले आहे. पुढील दोन दिवसांतच बैल पोळा येऊन ठेपला आहे. यानंतर लगेचच नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आदी मोठे सण आहेत. या काळात झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. यामुळे झेंडू उत्पादकांना सोन्याचे दिवस येतील, अशी आशा झेंडू उत्पादक शेतकरीवर्गाला लागली आहे.
जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्येही खंडेनवमीसाठी झेंडूच्या फुलांना दरवर्षीच मोठी मागणी असते. यामुळेदेखील यावर्षीही झेंडूंच्या फुलांना चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.
जेजुरीचा मर्दानी दसरा उत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक भाविक येतात. या काळात पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर तसेच निरा ते जेजुरी , झेंडेवाडी ते जेजुरी या दरम्यान अनेक शेतकरी झेंडू विकण्यासाठी दुकाने थाटतात. जेजुरीला येणारे भाविक आवर्जून थांबत झेंडूच्या फुलांची खरेदी करतात. झेंडूंच्या फुलांना यंदाही चांगला बाजारभाव मिळेल, अशी आशा शेतकरीवर्गाला आहे.