

रामदास डोंबे
खोर: सन 1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात आले होते. त्यानंतर जवळपास चार दशकांनंतर पुन्हा एकदा देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. येत्या 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दौंड तालुक्यात येणार आहेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ करण्यासाठी हा कार्यक्रम पार पडणार असून, यासाठी पंतप्रधान मोदींची उपस्थिती निश्चित झाली आहे.
सन 1985 मध्ये राजीव गांधी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ॲड. अशोक बापूराव खळदकर यांना दौंड विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. ॲड. खळदकर यांच्या प्रचारार्थ राजीव गांधी यांची जाहीर सभा दौंडमध्ये पार पडली. ही सभा विशेष ठरली, कारण राजीव गांधी हे पुण्यातील दौंड येथे येऊन जाहीर सभा घेणारे पहिले पंतप्रधान ठरले. (Latest Pune News)
आता तब्बल 40 वर्षांनंतर पुन्हा एकदा दौंड तालुक्यात देशाचे पंतप्रधान येत आहेत. येत्या 30 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. यासाठीची सभा भीमा सहकारी साखर कारखाना पाटस येथील कार्यस्थळाजवळ आयोजित करण्यात आली आहे. यामुळे दौंडवासीयांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, ऐतिहासिक परंपरेनंतर पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या उपस्थितीने दौंड तालुका अभिमानाने उजळणार आहे.
पाटस येथील कार्यक्रमस्थळाची पाहणी
ग्राममविकास विभागाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौंड तालुका दौरा निश्चित झाला आहे. येत्या 30 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दौंड तालुक्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील पाटस येथे निवड करण्यात आलेल्या कार्यक्रमस्थळाची नुकतीच पाहणी करण्यात आली. या पाहणीत सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, कार्यक्रमस्थळाची आखणी तसेच नागरिकांच्या सोयी-सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला.
पंतप्रधान नरेंद मोदी हे दौंड तालुक्यात येत आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ग्रामविकास अभियानाच्या शुभारंभाचे संयोजन दौंड तालुक्याला दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे ऋ ण व्यक्त करतो.
- राहुल कुल, आमदार, दौंड