

नारायणगाव: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांना जुन्नर सत्र न्यायालयाने सशर्त जामीन गुरुवारी (दि. 18) मंजूर केला. पन्नास हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर त्यांची सुटका होणार आहे. जुन्नरच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश संध्या नायर यांनी देवराम लांडे यांचा जामीन मंजूर केल्याची माहिती ॲड. केतन पडवळ यांनी दिली.
दरम्यान, जामीन मंजूर झाला असला तरी न्यायालयाच्या आदेशाचा लखोटा येरवडा कारागृहात वेळेवर पोचणार नसल्याने गुरुवारची रात्र त्यांना येरवडा जेलमध्ये काढावी लागणार आहे. देवराम लांडे यांना विनापरवाना कोणताही कार्यक्रम करायचा नाही, साक्षीदार व फिर्यादी यांच्यावर दबाव आणायचा नाही तसेच पोलिसांना तपास कार्यात सहकार्य करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. (Latest Pune News)
देवराम लांडे यांच्या वतीने न्यायालयामध्ये ॲड. सुमीत निकम व ॲड. केतन कुमार पडवळ यांनी बाजू मांडली दरम्यान, देवराम लांडे यांचे पुत्र अमोल लांडे याच्यावर या संदर्भात गुन्हा दाखल असून, तो फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.