

सुवर्णा चव्हाण
पुणे: बोरीवली येथे १०१ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होणार असून, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. मात्र, शंभराव्या ऐतिहासिक नाट्य संमेलनाचा सांगता सोहळा अद्याप झालेला नाही.
दोन वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी नाट्यरसिकांना शंभराव्या नाट्य संमेलनाच्या सांगतेची प्रतीक्षा आहे. त्यातच सध्याच्या राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे सांगता सोहळ्याचे आयोजन आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सुरुवातीपासूनच चर्चेत राहिले आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आहेत. संमेलनाचा शुभारंभ सोहळा २०२४ मध्ये पिंपरी-चिंचवड येथे मोठ्या दिमाखात पार पडला.
पुण्यात यानिमित्ताने नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे पूर्वसंध्येचा कार्यक्रम झाला. त्यानंतर राज्यातील विविध ठिकाणी संमेलनांतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाचा सांगता सोहळा रत्नागिरीत २४ ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत आयोजित केला होता.
मात्र, काही कारणांमुळे हा सोहळा पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर अद्यापही सांगता सोहळा झालेला नाही. त्यामुळे शंभराव्या संमेलनाची अधिकृत सांगता नेमकी कधी होणार? असा प्रश्न नाट्यवर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, बोरिवली येथे १०१ वे नाट्य संमेलन आयोजित करण्याची घोषणा झाल्याने शंभराव्या संमेलनाच्या समारोप कधी? असा प्रश्न नाट्यवर्तुळातून उपस्थित केला जात आहे. मात्र, जोपर्यंत शंभराव्या संमेलनाची सांगता होत नाही तोपर्यंत १०१ व्या संमेलनाची नांदी होणार नाही.
मात्र, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सध्या समारोपाच्या नियोजनाबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे १०१ व्या नाट्य संमेलनाच्या आयोजनाचे वेळापत्रकही प्रभावित होण्याची शक्यता आहे.
सांगता सोहळ्याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही : दामले
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले म्हणाले, “सध्या राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे शंभराव्या नाट्य संमेलनाच्या सांगता सोहळ्याबाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. अजून निर्णय झालेला नाही.”