Sugarcane Crushing Season: महाराष्ट्रात ऊस गाळपाला वेग; ७५ साखर कारखाने सुरू, २६ लाख टन उसाचे गाळप

राज्यात आतापर्यंत १६.७० लाख क्विंटल साखर उत्पादन; हंगाम २०२६-२७ साठी १६३ कारखान्यांना गाळप परवाने वितरित.
Sugarcane
Sugarcane Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

पुणे: राज्यातील ऊस गाळप हंगामाने आता हळूहळू वेग घेण्यास सुरुवात केली असून ७५ साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. त्यातून सद्यःस्थितीत २६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे.

तर ६.४० टक्के सरासरी उताऱ्यानुसार साखरेचे १६ लाख ७० हजार क्विंटलइतके उत्पादन हाती आले आहे. पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्यातील उर्वरित विभागातील कारखाने सुरू झाल्याचे चित्र साखर आयुक्तालयाच्या ताज्या अहवालावरून दिसून येत आहे.

यंदाच्या हंगाम २०२६-२७ साठी प्रादेशिक साखर सह संचालक स्तरावरून सहकारी १०४ व खासगी १०८ मिळून २१२ साखर कारखान्यांचे ऊस गाळप परवाने प्राप्त झाले. त्यामध्ये छाननीअंती शुक्रवारअखेर (दि.२३) साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी ८० सहकारी आणि ८३ खासगी मिळून एकूण १६३ साखर कारखान्यांना ऊस गाळप परवाने ऑनलाईनद्वारे वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Sugarcane
Rana Suryavanshi Attack Case: राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवे वळण; स्वतःवर हल्ला घडवल्याचा पोलिसांचा दावा

तर प्रत्यक्षात शुक्रवारी (दि.२३) सहकारी ३३ आणि खासगी ४२ मिळून एकूण ७५ कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले आहे. विभागनिहाय कारखाना सुरू झाल्याची अहवालातील स्थिती पाहता कोल्हापूर विभागात ३, पुणे ११, सोलापूर १९, अहिल्यानगर १३, छत्रपती संभाजीनगर ११, नांदेड १७, अमरावती १ कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांचे ऊस गाळप संथ गतीने सुरू आहे. कोल्हापूर विभागात तीनही खासगी साखर कारखाने सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या मागण्यांवर शासन स्तरावरून आयोजित बैठकीत नेमका कोणता तोडगा निघणार, यावरच पश्चिम महाराष्ट्रातील ऊस गाळप हंगामाचे चित्र अवलंबून राहिल, असे सांगण्यात आले.

Sugarcane
Pune Dam Storage: पुणेकरांनो लक्ष द्या! धरणसाठ्यात जवळपास ४ टीएमसीची तूट; खडकवासला साखळी ८४.८९ टक्क्यांवर

मागण्यांवर सहकार मंत्री लक्ष कधी घालणार?

यंदाचा हंगाम सुरू करण्यास विरोध करून आपल्या विविध मागण्यांवर प्रथम निर्णय घ्यावा, उसाला दर देण्याची मागणी तसेच साखर उद्योगाच्या हिताच्या मागण्यांवर शेतकरी संघटनांनी प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात रान पेटवले आहे.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे याप्रश्नी पुढाकार घेऊन संयुक्त बैठक घेण्यासाठी कधी लक्ष घालणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, संघटनांच्या मागण्यांवरच पश्चिम महाराष्ट्रातील ऊस गाळपाची स्थिती अवलंबून राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news