

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे विभागात सर्व विभागांकडे सापडलेल्या कुणबी नोंदी, दिलेली प्रमाणपत्रे याची आकडेवारी न्या. शिंदे समितीला सादर केली. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांत सुमारे दोन लाख 38 हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मात्र, नोंदीची माहिती जाहीर करू नका, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र नागरिकांना देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शनिवारी आढावा घेतला.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील अधिकार्यांनी माहिती सादर केली. बैठकीला पुणे विभागीय आयुक्त, पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये आतापर्यंत किती कुणबी नोंदी सापडल्या, नोंदी तपासताना काही अडचणी येत आहेत किंवा कसे, कोणती कागदपत्रे तपासली याची माहिती घेतली.
कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरूच ठेवा. या कामकाजात काही अडचणी, समस्या आल्यास तातडीने कळवावे, अधिकाधिक नोंदी कुठे, कशा सापडतील, याची चाचपणी करावी, अशा सूचना केल्या आहेत. दरम्यान, पुणे विभागातील सर्वाधिक पुणे जिल्ह्यात एक लाख 40 हजार कुणबी नोंदी आतापर्यंत सापडल्या आहेत. सातार्यात 48 हजार 802, सांगलीत 12 हजार 800, कोल्हापूर 15 हजार आणि सोलापूर 22 हजार अशा सुमारे दोन लाख 38 हजार 602 कुणबी नोंदी सापडल्याची माहिती समोर येत आहे.
न्या. शिंदे समिती प्रत्येक विभागाचा आढावा घेत आहे. कुठल्याही विशेष सूचना दिल्या नाहीत. पुणे विभागात ज्या कुणबी नोंदी सापडल्या, त्या नोंदींची आकडेवारी सांगता येणार नाही. केवळ नोंदींचा आढावा बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकार्यांनी सांगितले.
महसूल विभागाकडून कुणबी नोंदींबाबत सुरू असलेली कार्यवाही पुढील दहा दिवसांत संपेल. मात्र, पुराभिलेख विभागाकडील कागदपत्रे जास्त असल्याने आणि कागदपत्रे जतन करण्याचे मूळ काम असल्याने बाकीच्या अधिकारी, कर्मचार्यांना त्यांच्याकडील कागदपत्रे हाताळता येत नाहीत. पुराभिलेखकडील नोंदी तपासण्याचे काम आणखी काही दिवस सुरू राहील. कुणबी नोंदी किती सापडल्या, याबाबतची आकडेवारी जाहीर करण्याची परवानगी जिल्हाधिकार्यांना मिळेल. त्यानंतरच आकडेवारी जाहीर केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा