मोबाईल क्रमांकाच्या सुरुवातीला +९१ का वापरले जाते? | पुढारी

मोबाईल क्रमांकाच्या सुरुवातीला +९१ का वापरले जाते?

नवी दिल्ली : कॉल करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली आहे का की, मोबाईल नंबरच्या पुढे +91 कोड लिहिलेला असतो? कदाचित आपल्यापैकी बहुतेकांना हे माहीत असेल की हा भारताचा कोड आहे, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की, भारताचा कोड फक्त +91 का ठेवण्यात आला आहे. कंट्री कॉलिंग कोड कसे ठरवले जातात आणि ते कोण ठरवते? यासाठी काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.

देशाचे कॉलिंग कोड किंवा डायल-इन कोड टेलिफोन नंबरच्या पुढे वापरले जातात. त्याच्या मदतीने, एखादी व्यक्ती आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (आयटीयू) सदस्यांशी किंवा प्रदेशातील टेलिफोन ग्राहकांशी जोडले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, भारतासाठी हा कोड +91 आहे. तर पाकिस्तानचा डायल कोड +92 आहे. या कोडना ‘आंतरराष्ट्रीय ग्राहक डायलिंग’ असेही म्हणतात. ‘आयटीयू’ म्हणजेच इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन ही एक विशेष एजन्सी आहे, जी संयुक्त राष्ट्रांचा भाग आहे. ही एजन्सी माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाशी संबंधित समस्यांवर काम करते.

17 मे 1865 रोजी आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ युनियन म्हणून त्याची स्थापना झाली. त्याचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. एकूण 193 देश या संघाचा भाग आहेत. देश कोड देणे हा त्याच्या कामाचा एक भाग आहे. म्हणजेच या एजन्सीने भारताला +91 कोड दिला आहे. देश कोड आंतरराष्ट्रीय टेलिफोन नंबरिंग योजनेचा भाग आहेत. एका देशातून दुसर्‍या देशात कॉल करताना हे वापरले जातात. हा कोड तुमच्या देशात आपोआप येतो, पण आंतरराष्ट्रीय नंबर डायल करण्यासाठी तुम्हाला हा कोड वापरावा लागेल. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या देशातील दुसर्‍या स्थानिक वापरकर्त्याला कॉल करता तेव्हा हा कोड आपोआप वापरला जातो. पण आंतरराष्ट्रीय कॉलमध्ये तुम्हाला हा कोड वेगळा वापरावा लागेल. कोणत्या देशाला कोणता कोड मिळेल हे त्याच्या झोन आणि झोनमधील क्रमांकाच्या आधारे ठरवले जाते.

भारत नवव्या झोनचा भाग आहे, ज्यामध्ये मध्य पूर्व आणि दक्षिण आशियातील बहुतेक देशांचा समावेश आहे. येथे भारताला 1 कोड मिळाला आहे. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय डायलिंग कोड +91 आहे. तुर्कस्तानचा कोड +90, पाकिस्तान +92, अफगाणिस्तान +93 आणि श्रीलंकेचा +94 आहे.

Back to top button