नोझलमध्ये हेराफेरी : वैधमापनच्या संगनमताने इंधन चोरी!

नोझलमध्ये हेराफेरी : वैधमापनच्या संगनमताने इंधन चोरी!

पुणे : राज्यात इतर विभागांबरोबरच सर्वात अधिक महसूल देणार्‍या वैधमापनशास्त्र विभागातील भ्रष्टाचार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. यामध्ये पंपचालक आणि वैधमापन निरीक्षक, अधिकारी यांच्यात मिलीभगत असून, केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी कमी इंधन दिले जात असल्याचा अनेक वाहनचालकांचा अनुभव आहे. यामधून कोट्यवधी रुपयांचा राजरोस भ्रष्टाचार होत असून यात सर्वसामान्यांची आर्थिक लूट होत आहे.

लाचलुचपत विभागाने नुकतेच वैधमापनशास्त्र विभागातील एका निरीक्षकास पेट्रोलपंपावर कारवाई न करण्यासाठी लाच घेताना पकडले. संबंधित निरीक्षकांच्या घराची झडती घेतली असता लाखो रुपयांचे घबाड सापडले असल्याची बाब पुढे आली आहे. या प्रकारामुळे वैधमापनशास्त्र विभागात भ्रष्टाचाराची पाळेमुळे अत्यंत खोलवर रुजली असल्याचे समोर आले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात सुमारे 550 च्या आसपास पेट्रोल पंप असून, यामधील काही पंपचालक हे वैधमापनशास्त्र विभागातील निरीक्षक, अधिकारी यांच्याशी संगनमत करून वाहनधारकांना इंधन देताना ते सोडण्यासाठी असलेल्या 'नोझल' मध्ये हेराफेरी करीत आहेत.

या हेराफेरीमुळे लिटरमागे किमान 20 मि.ली.च्या पुढेच इंधन वाहनचालकांना कमी येत आहे. या प्रकारे दिवसाला लाखो लिटर इंधनाची चोरी होत असल्याची बाब पुढे आली् असून, यामधून दर महिन्याला कोट्यवधी रुपये पंपचालक ग्राहकांकडून लूटत असल्याचा धक्कादायक प्रकार शहर जिल्ह्यातील काही पंपचालक करीत आहेत. हा प्रकार करण्यासाठी वैधमापनशास्त्र विभागातील निरीक्षकांना प्रतिनोझल अडीच ते तीन हजार रुपये द्यावे लागतात, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका पंपचालकाने सांगितली.

आडमार्गाने दिला जातो 'निधी'

शहर जिल्ह्यात सुमारे 550 पेट्रोल पंप असून, एका पेट्रोल पंपावर किमान 10 नोझल असतात. त्या नोझलच्या मागे महिन्याला वैधमापनशास्त्र विभागातील निरीक्षकास अडीच ते तीन हजार रुपये ऑनलाइन 'निधी' द्यावा लागतो. म्हणजे महिन्याला या विभागास आडमार्गाने कोट्यवधी रुपये मिळत असल्याची बाब पुढे आली आहे.

नोझलमधील हेराफेरीचा दर महिन्याला मोबदला?

पुणे शहर जिल्ह्याचे वैधमानपनाशास्त्र विभागाने मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून कामकाज सुरळीत होण्यासाठी चार जिल्ह्यांमध्ये रूपांतर केले आहे. पर्यायाने चारही जिल्ह्यास अधिकारी व निरीक्षक यांची पदसंख्या जास्त आहे. मात्र, तेवढ्या प्रमाणात अधिका-यांची नियुक्ती शासनाकडून झालेली नाही. त्यामुळे पेट्रोल पंप तपासण्यासाठी कोणताही निरीक्षक मिलीभगतमुळे जात नाही. त्यामुळे नोझलमध्ये केलेल्या हेराफेरीचे संबंधित निरीक्षकास त्या-त्या विभागात असलेल्या पंपचालकाकडून महिन्याला ठरवून दिलेली रक्कम मिळत असते.

तक्रार करूनही अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

या प्रकाराबाबत एखाद्या वाहनधारकाने कमी इंधन मिळत असल्याची तक्रार वैधमापनशास्त्र विभागाकडे केल्यास त्याकडे या विभागातील निरीक्षक, अधिकारी ठरवून डोळेझाक करीत असतात. त्यामुळे हा गोरखधंदा राजरोजसपणे चालू आहे.

शहर जिल्ह्यातील पेट्रोल पंपचालकांनो, वैधमापनशास्त्र विभागातील निरीक्षकांना अजिबात घाबरू नका. त्यांना कोणत्याही प्रकारची पंपाची तपासणी करू द्या. आपण स्वत: क्लिअर असले पाहिजे. तसे असेल तर कोणत्याही निरीक्षकाने पैशाची मागणी केली तर त्यास ठोकून काढा.

– अली दारूवाला, राष्ट्रीय प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डिझेल डिलर्स असोसिएशन.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news