

पुणे: पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील पावसाळी लाइन स्वच्छतेची कामे सुरू असतानाच सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. महापालिकेने केवळ 12 ठिकाणी पाणी साचल्याचा दावा केला असला, तरी अनेक रस्त्यांवर साचलेल्या या पाण्यामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला.
महापालिकेकडून सध्या पावसाळापूर्वची नालेसफाई आणि चेंबर स्वच्छतेची कामे सुरू आहेत. ही कामे सुरू असतानाच सोमवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने प्रामुख्याने चेंबरस्वच्छतेच्या सुरू असलेल्या कामांचा अक्षरश: बुरखा फाटला. साधारण तास-दीड तास पडलेल्या या पावसामुळे अनेक भागांतील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
प्रामुख्याने औंध, बाणेर, विद्यापीठ रस्ता, पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क परिसर, बंडगार्डन, फुलेनगर आरटीओ, नगर रस्ता, रामवाडी या भागांतील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी महापालिका कर्मचाऱ्यांनी पावसाळी चेंबरची स्वच्छता केल्यानंतर या पाण्याचा निचरा झाला. दरम्यान, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे गणेश सोनुने यांनी 12 ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे सांगितले. प्रामुख्याने औंध भागात एका तासात 30 मिमी पावसाची नोंद झाल्याने या भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याचे सोनुने यांनी सांगितले.