

वेल्हे : पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा 2026 च्या पार्श्वभूमीवर आणि रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सिंहगड घाटमार्गावरील वाहतुकीत बदल करण्याचे आणि किल्ल्यावरील वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
24 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डोणजे गोळेवाडी टोलनाका ते सिंहगड घाटातील कोंढणपूर टोलनाका ते अवसरेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम केले जाणार आहे. या कालावधीत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. पर्यायी मार्गावरून वाहतूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी येणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. पर्यटकांना आतकरवाडी पायी मार्गाने किल्ल्यावर जाता येणार आहे.
पानशेत, खानापूर, डोणजे, अतकरवाडी बाजूकडून सिंहगड घाटमार्गे खेड-शिवापूरकडे जाणारी वाहतूक-डोणजे चौकपासून खडकवासला, किरकटवाडी, नांदेडसिटी, वडगाव धायरी बाजूने पुणे-बंगलोर महामार्ग मार्गे खेड-शिवापूरकडे वळविण्यात येणार आहे. गोळेवाडी चौक ते सिंहगड पाट (कोंढणपूर बाजूकडून) यादरम्यान कोणत्याही वाहनांना वाहतूक करण्याची परवानगी नसेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. सायकल स्पर्धकांची सुरक्षितता व सोयीच्या दृष्टीने हे बदल करणे आवश्यक असल्याने नागरिकांनी आणि वाहनचालकांनी या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले.