

शिवनगर: बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा सध्या राज्यभर डंका वाजत आहे. रविवारी (दि. 22) मतदानाचा दिवस. मात्र, शनिवारी (दि. 21) ’माळेगाव’च्या कार्यक्षेत्रात लक्ष्मीदर्शनाच्या चर्चेचा बोलबाला सुरू होता. प्रत्येक पॅनेलच्या नेत्यांवर ’टेन्शन’ दिसत होते, तर कार्यकर्त्यांची पळापळ सुरू होती. मात्र, मतदार शांत होता, असे चित्र पाहावयास मिळाले. (Latest Pune News)
उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः उभे असल्याने या चर्चेला अधिकृत उधाण आले. मतदानाच्या आदल्या दिवशी शनिवारी मात्र सर्वांचीच पळापळ सुरू होती. प्रत्येक पॅनेलचा कार्यकर्ता आपापल्या परीने आपापल्या माणसांना, आपापल्या नातेवाइकांना, मित्रपरिवारांना भेटत होता, आमचाच पॅनेल कसा चांगला, हे सांगत होता.
तर, कार्यकर्त्यांची ही पळापळ सुरू असताना मतदार मात्र शांत दिसून आला. दरम्यान, ही सर्व चर्चा सुरू असताना सर्वत्र बोलबाला झाला तो लक्ष्मीदर्शनाचा; मग काही ठिकाणी एवढ्याने वाटप झाले, काही ठिकाणी पॅनेल टू पॅनेलसाठी वाटप झाले, काही ठिकाणी एकाच मताची मागणी करून वाटप करण्यात आले, अशा अनेक चर्चांना परिसरामध्ये शनिवारी दिवसभर उधाण आले होते.
कारखान्याच्या या चौरंगी लढतीमध्ये कधी नव्हे एवढी चुरस निर्माण झाली आहे. असे असताना मतदारांचा मात्र अंदाज कोणालाच लागत नव्हता. नेते, कार्यकर्ते सगळे झपाटून कामाला लागले होते. त्यांची सर्वत्र पळापळ चालू होती. त्यांच्या दृष्टीने एक एक मिनिट महत्त्वाचा होता, त्यादृष्टीने ते प्रयत्न करीत होते.
मतदारांची शांतता पेचात पाडणारी
या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचे निदर्शनास आले; ते म्हणजे प्रत्येक पॅनेलचे नेते पॅनेल बनविण्यापासून ते जाहीर होईपर्यंत आणि जाहीर झाल्यानंतर प्रचार संपेपर्यंत चिंतेत होते, तर प्रत्येक पॅनेलचे कार्यकर्ते सुसाट होते, मतदारराजा मात्र शांतच होता.