

महाळुंगे पडवळ: आंबेगाव तालुक्यातील चास येथील शेगरमळा, तोडकरमळा, कडेवाडी, राजेवाडी व वाड्या-वस्त्यांमध्ये 4 बिबट्यांचा सक्रिय वावर आढळून आला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवाजी बारवेकर यांच्या कांद्याच्या बराखीजवळ दोन बिबटे बसलेले दिसून आले. दिलीप, मंदा, राजश्री आणि सुरेखा तोडकर यांनी हे बिबटे पाहिल्याचे सांगितले. चास-घोडेगाव रस्त्यालगत पीराच्या मंदिराजवळही दोन बिबटे शिकारीच्या शोधात फिरताना आढळले. (Latest Pune News)
शुक्रवारी (दि. 20) सकाळी हरिओम तोडकर यांच्या बंगल्याजवळ तसेच उत्तम शेगर व कचर तोडकर यांच्या शेतात बिबट्या फिरताना तुकाराम बारवेकर यांच्यासह अनेकांनी पाहिले.
शुक्रवारी पहाटे बिबट्याने धनगर समाजातील व्यक्तीची शेळी फस्त केली. याआधीही कचर, हरिओम आणि यशवंत तोडकर यांची पाळीव कुत्री बिबट्याने फस्त केली आहेत. शेगरमळ्यात निवृत्ती नारायण शेगर यांच्या दोन शेळ्यांवर हल्ला करून एक ठार केली असून, एक जखमी आहे. तसेच, राजेवाडी-कडेवाडी परिसरात बिपीन नवनाथ चासकर यांचे वासरू उसाच्या शेतात बिबट्याने नेले आहे.
या घटनांनंतर वन अधिकारी सोनल भालेराव, सुशांत चासकर आणि बी. एस. गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दिवसाढवळ्या बिबट्या फिरत असल्याने शेतकर्यांचा जीव धोक्यात आला आहे. तातडीने पिंजरा लावा; अन्यथा आंदोलन करू, असा इशारा चास ग्रामपंचायत सदस्य व बजरंग दलाचे अध्यक्ष नितीन चासकर यांनी दिला आहे.