

माळेगाव: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून व विरोधी शेतकरी सहकार बचाव पॅनेल तावरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल होत असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही या निवडणुकीत उडी घेतली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्या दिवशी शुक्रवारी (दि. 23) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार, हे निश्चित झाले आहे. (Latest Pune News)
राजकीय बलाबलासाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी महत्त्वाची आहे. ’सोमेश्वर’ व ’श्री छत्रपती’ हे कारखाने त्यांच्या ताब्यात असल्याने माळेगाव कारखान्यावर आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी अजित पवार यांनी पावले उचलली असून, सर्व ताकदीनिशी ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ’पुढे कोणताही पॅनेल असो, पवार हाच तगडा पॅनेल असेल’ असे घोषित करीत अजित पवार यांनी विरोधी गटाच्या नेत्यांना आव्हान दिले आहे.
अजित पवार यांनी मोठी घोषणा केली असली, तरी माळेगाव हे बंडखोर म्हणून परिचित असल्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांनी कोणालाच एकहाती सत्ता दिली नसल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अनेक नव्या- जुन्या जाणत्या उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे, तर दुसरीकडे विरोधी गटाचे प्रमुख चंद्रराव तावरे आणि रंजनकुमार तावरे हे स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करीत शेतकरी सहकार बचाव या पॅनेलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
या दोन्ही प्रमुख गटांत सरळ लढत होणार, अशी चर्चा सुरू असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विलासराव नारायण सस्ते, दत्तात्रय सणगर, अखिलेश ज्ञानेश्वर शिंदे, सोपान देवकाते, राजेंद्र जाधव, भरत बनकर यांच्यासह अनेक जणांनी अर्ज दाखल केले आहेत.