मंचर: अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे सुमारे 28 लाख रुपये खर्च करून 4 महिन्यांपूर्वी अद्ययावत तलाठी कार्यालय इमारतीचे काम पूर्ण झाले. मात्र, तलाठी भाऊसाहेब यांनी जुन्या फर्निचरच्या अडचणीचे कारण दिले असून आजही कामकाज जुन्या अपुर्या जागेत चालू आहे. त्यामुळे नवीन इमारत धूळ खात पडून आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अवसरी बुद्रुक गावात पेशवेकालीन कचेरी होती. त्या जागेत मागील अनेक दशके तलाठी कार्यालयाचे काम सुरू होते. या तलाठी कार्यालयात अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, टाव्हरेवाडी या तीन गावांचा महसुली कारभार चालतो. (Latest Pune News)
मात्र काळाच्या ओघात इमारत जीर्ण झाल्याने तलाठी कार्यालय इतरत्र सुरू केले होते. अवसरी बुद्रुक ग्रामस्थ मागील 15-16 वर्षांपासून नवीन इमारतीत तलाठी कार्यालय व्हावे, अशी मागणी करत होते, त्याला यश येत नव्हते.
अखेर जयेश शहा यांनी तलाठी कार्यालय मंजूर व्हावे, यासाठी 5 एप्रिल 2023 रोजी उपोषणाचा इशारा दिला. त्यानंतर तत्कालीन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून तलाठी कार्यालयासाठी निधी मंजूर केला.
मागील 3 महिन्यांपासून इमारत पूर्ण झाली असून या इमारतीसाठी फर्निचर नसल्याने तलाठी कार्यालय ग्रामपंचायतीच्या जुन्या छोट्या खोलीत सुरू आहे. या ठिकाणी चार माणसेसुद्धा नीट बसू शकत नाहीत. प्रशस्त इमारत तयार झाली असून, या इमारतीत टेबल-खुर्ची उपलब्ध करून कामकाज होऊ शकते. असे असताना देखील ही नवीन इमारत फर्निचरच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून आले.
तलाठी कार्यालयातील नवीन फर्निचरसाठी निधी उपलब्ध होईल. तातडीने सध्या चालू असलेल्या जुन्या जागेतील फर्निचर सोमवारी (दि. 26) नवीन इमारतीत वापरण्यासाठी नेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सोमवारपासून नवीन इमारतीत कामकाज सुरू केले जाईल.
- गोविंद शिंदे, प्रांताधिकारी, मंचर.