Mahesh Mote: डोळ्यात पाणी... ‘मला मारू नका... राजसाहेब माफ करा!’ मनसेच्या इशाऱ्यानंतर महेश मोटेचा माफीनामा

Mahesh Mote Raj Thackeray Apology: मनसेने तीव्र इशारा दिल्यानंतर मोटे यांनी राज ठाकरे, मनसे कार्यकर्ते आणि मराठा समाजाची माफी मागत आपल्याला धमक्या मिळत असल्याचा दावा केला.
Mahesh Mote Raj Thackeray Apology
Mahesh Mote Raj Thackeray ApologyPudhari
Published on
Updated on

Mahesh Mote Raj Thackeray Apology: राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेले महेश मोटे यांनी आता व्हिडिओद्वारे जाहीर माफी मागितली आहे. आपल्या आधीच्या वक्तव्याबाबत गैरसमज झाल्याचे सांगत त्यांनी राज ठाकरे, मनसे कार्यकर्ते आणि मराठा समाजाची माफी मागितली आहे. दरम्यान, मनसेनेही या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत महेश मोटे यांना इशारा दिला आहे.

महेश मोटे यांनी व्हिडिओमध्ये राज ठाकरे यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त केला. राज ठाकरे यांना वैयक्तिक आयुष्यात आरामात जगण्याची संधी असूनही त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी अनेकदा संघर्ष केला, असे मोटे यांनी म्हटले आहे. मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी राज ठाकरे व मनसेने काम केल्याचेही त्यांनी नमूद केले.

मनसेच्या स्थापनेपासून मराठी अस्मिता, नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य, मराठी पाट्या आणि इतर मुद्द्यांसाठी पक्षाने भूमिका घेतल्याचा उल्लेखही त्यांनी केला. नाशिक महानगरपालिकेत मनसेची सत्ता असताना शहरातील रस्ते, स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनासंदर्भात चांगले काम झाल्याचे सांगत, आपल्याला मनसे आणि राज ठाकरे यांचे महत्त्व उशिरा समजले, अशी कबुली महेश मोटे यांनी दिली.

मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतही गैरसमज झाल्याची कबुली

महेश मोटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही आपला गैरसमज झाल्याचे व्हिडिओत म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत आपण सुरुवातीला चुकीच्या पद्धतीने विचार केला होता, असे त्यांनी सांगितले. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या लोकांसाठी ते लढत असल्याचे नंतर आपल्याला समजल्याचे मोटे यांनी म्हटले. या मुद्द्यावरही आपण केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागितली.

Mahesh Mote Raj Thackeray Apology
Doctor Slaps Video: ‘मला शिकवतेस का?’ म्हणत महिला डॉक्टरला मारली चापट; हॉस्पिटलमध्ये खळबळ, आरोपी डॉक्टरला अटक, काय घडलं?

धमक्या मिळत असल्याचा महेश मोटेंचा दावा

या वादानंतर आपल्याला धमक्या मिळत असल्याचा दावाही महेश मोटे यांनी केला आहे. व्हिडिओमध्ये ते भावनिक झाल्याचे दिसत असून, आपल्याला मारहाणीच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना आपल्याला इजा करू नये, असे आवाहन करावे, अशी विनंतीही त्यांनी केली.

आपण मराठी माणूस असून राज ठाकरे यांचे नाव नेहमी आदराने घेतल्याचा दावा महेश मोटे यांनी केला. मात्र, या वादानंतर आपल्याला भीती वाटत असल्याचे आणि तणावामुळे आपण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

Mahesh Mote Raj Thackeray Apology
Medhavi Bidhuri: विकेट पडताच केलं ‘6-7’ सेलिब्रेशन; रातोरात व्हायरल झालेली मेधावी बिधुरी आहे तरी कोण? सोशल मीडियावर धुमाकूळ

‘महेश मोटेला पुण्यात फिरू देणार नाही’; मनसेचा इशारा

दरम्यान, राज ठाकरे यांच्याबद्दल महेश मोटे यांनी चुकीचे वक्तव्य केल्याचा आरोप करत मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे उपविभाग अध्यक्ष शुभम जयवंत जगदाळे यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

‘मनसे स्टाईल’ने चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा देत महेश मोटे यांना पुण्यात फिरू देणार नाही, असे जगदाळे यांनी म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महेश मोटे यांनी आता व्हिडिओद्वारे माफी मागितल्यानंतर या वादावर पडदा पडणार का, की मनसेकडून प्रतिक्रिया येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news