

पुणे: ठिकाण 130 दांडेकर पूल... वीजमीटरचे बिलावर रीडिंग उपलब्ध नाही... तरी देखील पाच हजारांचे बिल महावितरणने पाठविले... बिल न भरल्याने कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता वीजमीटर काढून नेले, याचा मनस्ताप 100 वर्षांच्या आजीबाई आणि त्यांच्या सत्तर वय असलेल्या सूनबाईंना बसला.
अगोदरच कडक उन्हाळा आणि त्यात वीजमीटर काढून नेल्याने दोघींना उकाड्यात दिवस काढावा लागलाच, शिवाय विजेअभावी रात्रदेखील अंधारात काढावी लागली. यास महावितरणचे अधिकारी जबाबदार असून, किमान वृद्ध महिलांचे वय तरी बघा? असा सवाल या भागातील नागरिकांनी केला आहे. दरम्यान, शंभर वय असलेल्या आजीबाईंचे नाव हिराबाई यादव पालखे असे आहे.
महावितरणने मार्च महिन्याचे औचित्य साधून वीजबिल वसुली करण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर उघडली आहे. या मोहिमेमुळे सर्वसामान्य वीजग््रााहक चांगलेच हैराण झाले आहेत. मात्र, असे असले तरी महावितरणचे कर्मचारी वीजबिल न भरल्यास तत्काळ वीजमीटर काढून नेत आहेत.
मात्र, आपण कोणाचे वीजमीटर काढत आहोत, याची कोणतीही शहानिशा करीत नसल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. दांडेकर पूल परिसरात राहणाऱ्या आजीबाईंचे नाव हिराबाई यादव पालखे (वय 100) आणि त्यांच्या सूनबाई वय वर्षे 70 यांना वीजबिल सुमारे पाच हजार आले. मात्र, वीजबिलावर रीडिंग उपलब्ध नाही, असा शेरा मारला होता. वीजबिल न भरल्याने संबंधित महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मीटर काढून नेला.
मात्र, याची खबर त्या आजीबाईंना समजलीच नाही. त्यांना ऐन उन्हाळ्याच्या दिवसात विजेअभावी घरात उकाड्यात काढावी लागली, तर रात्र अंधारात... यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला असून, मीटर तोडताना किमान आजीचे वय काय आहे हे तरी बघा? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.