

पुणे: जिल्हा परिषदेचा सन 2026-27 चा मूळ अर्थसंकल्प तसेच सन 2025-26 चा अंतिम सुधारित अर्थसंकल्प मंगळवारी (दि. 17 मार्च) सकाळी 11 वाजता सादर करण्यात येणार आहे. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
शासनाच्या निर्देशानुसार, 27 मार्चपूर्वी जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मंजूर करणे आवश्यक आहे. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड 18 मार्च रोजी होणार आहे. अध्यक्ष निवडीनंतर सर्वसाधारण सभा बोलावून अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेला किमान कालावधी उपलब्ध होत नसल्याने अखेर प्रशासकांकडून अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्प सादर व मंजुरी प्रक्रियेसाठीचे सूचनापत्र काढण्यात आले आहे.
जिल्हा परिषद सभा नियमावलीनुसार नियमित सभा बोलाविण्यासाठी किमान 17 दिवसांपूर्वी सूचना देणे आवश्यक असते, तर तातडीची सभा बोलावण्यासाठीही किमान 12 दिवसांचा अवधी आवश्यक असतो. अध्यक्ष निवड 18 मार्च रोजी होत असून, शासनाने 27 मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे उपलब्ध कालावधी अवघा नऊ दिवसांचा ठरत असल्याने ही प्रक्रिया प्रशासकांकडून पार पाडली जात आहे. 17 मार्च रोजी सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पात सन 2025-26 चा अंतिम सुधारित अंदाजपत्रक तसेच सन 2026-27 चा मूळ अंदाजपत्रक मांडण्यात येणार आहे. अध्यक्षनिवडीनंतर बोलावण्यात येणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा अर्थसंकल्प अवलोकनार्थ सभेपुढे ठेवला जाण्याची शक्यता आहे.