

पुणे: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने सिंगल गर्ल चाइल्ड स्कॉलरशिपसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थी किंवा पालक सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट ललीश.र्सेीं.ळप ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. नवीन विद्यार्थ्यांसोबतच सीबीएसईने नूतनीकरण अर्जांची देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थिनींना आधीच ही शिष्यवृत्ती मिळाली आहे, त्यादेखील त्यांच्या अर्जांचे नूतनीकरण करू शकतात.
पालकांची एकुलती एक मुलगी या योजनेसाठी अर्ज करू शकते. विद्यार्थिनीने दहावीत 70 टक्के गुण घेतलले असावे आणि सीबीएसईशी संलग्न शाळेत अकरावीचे शिक्षण घेत असले पाहिजे. दहावीचे शिक्षण शुल्क दरमहा 2500 रुपयांपेक्षा जास्त नसावे आणि अकरावी आणि बारावीचे शिक्षण शुल्क 3 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. एनआरआय अर्जदारांसाठी शिक्षण शुल्क 6 हजार रुपये आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त नसावे. जर विद्यार्थिनींची या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली, तर तिला अकरावी आणि बारावीपर्यंतचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल.
शिष्यवृत्तीसाठी असा करा अर्ज
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर अर्ज लिंकवर क्लिक करा. लिंकवर क्लिक केल्यानंतर वैयक्तिक, शैक्षणिक आणि बँक तपशील प्रविष्ट करावे. सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर प्रिंटआउट घ्या. अर्जासाठी शाळेकडून पडताळणी देखील अनिवार्य आहे.