महाशिवरात्री : अडीच लाख भाविकांनी घेतले भीमाशंकरचे दर्शन !

महाशिवरात्री : अडीच लाख भाविकांनी घेतले भीमाशंकरचे दर्शन !
Published on
Updated on

भीमाशंकर : पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीला 'जंगलवस्ती भीमाशंकर की जय' च्या जयघोषात सुमारे अडीच लाख भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. यात्रा काळात अनेक मान्यवरांनी दर्शन घेतले. दर्शन बारीसह मुखदर्शन व पासची सुविधा भाविकांना देवस्थानतर्फे करण्यात आली होती, यामुळे भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाले होते. भीमाशंकरपासून अलीकडे सहा किलोमीटर अंतरावर टेम्पो, मिनी बस व मोठ्या वाहनांसाठी 5 नंबर वाहनतळावर व्यवस्था करण्यात आली होती. चारचाकी छोट्या गाड्यांसाठी वाहनतळ क्रमांक 3 व 4 येथे व्यवस्था करण्यात आली. वाहनतळ क्रमांक 1 व 2 मध्ये दुचाकींची व्यवस्था केली होती. वाहनतळ ते भीमाशंकर बसस्थानकापर्यंत मिनी बसची व्यवस्था होती. भीमाशंकर येथील बेल-फूल विक्रेते, डोलीवाले, हॉटेल, लॉज, माळा, रुद्राक्ष माळा, वनस्पती औषधे आदी व्यावसायिकांनी स्टॉल लावले होते.

पोलिस बंदोबस्त

घोडेगाव व खेड पोलिस ठाण्याच्या वतीने सुमारे 20 पोलिस अधिकारी, 240 महिला व पुरुष पोलिस कर्मचारी, 60 होमगार्ड, एसआरपी पथकातील 1 अधिकारी, 60 कर्मचारी तसेच 2 दंगा काबू पथक आणि बॉम्ब शोधपथक असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. साखळीचोर, पाकीटमार करणारे व छेडछाड करणार्‍या व्यक्ती यांच्यावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व चित्रीकरण करणारी पथके नेमण्यात आली होती. तसेच साध्या वेशातील पोलिस पथक नेमण्यात आले होते. अवैध दारू व भांग विक्री करणार्‍यांवर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांचे स्वतंत्र पथक नेमण्यात आले होते.

एसटी महामंडळाकडून 60 बस

मंदिर परिसरात 108 नंबरची रुग्णवाहिका, आरोग्य विभाग, वनविभागाचे कर्मचारी, अग्निशामक दल हजर होते. आळंदीतील स्वकाम सेवा मंडळाचे 40 महिला व पुरुष कार्यकर्ते मंदिर परिसर व दर्शना बारी स्वच्छ करण्याचे काम करीत होते. वाहनतळ ते भीमाशंकर बसस्थानकापर्यंत भाविकांना जा- ये करण्यासाठी एसटी महामंडळाच्या 60 बस होत्या. बसस्थानक ते पार्किंग असे एकंदरीत 35 बसगाड्या होत्या. अनेक ठिकाणी मोफत फराळवाटप सुरू होते. भीमाशंकरचे सरपंच दत्तात्रय हिले, आंबेगावचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक, देवस्थान अध्यक्ष सुरेश कौदरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुर्दशन पाटील, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, नायब तहसीलदार दामूराजे आसवले, अनंता गवारी, देवस्थान विश्वस्त मधुकर शास्त्री गवांदे, रत्नाकर कोडिलकर, विनायक कोडीलकर आदी यात्रेवर लक्ष ठेवून होते.

दिलीप वळसे पाटलांच्या हस्ते शासकीय महापूजा, जलाभिषेक

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 7) मध्यरात्री 12 वाजता पवित्र शिवलिंगाला जलाभिषेक करण्यात आला. या महापूजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. 'हर हर महादेव' व 'जंगलवस्ती भीमाशंकर की जय'च्या जयघोषात भाविकांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले. या वेळी भीमाशंकर मंदिर व सभामंडपाला विविध आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच रात्रीच्या सुमारास मंदिरावर लेझर शोचा झगमगाट व रोषणाई करण्यात आली. भीमाशंकरला महाशिवरात्रीमुळे भाविक दोन दिवस आधीच येथे मुक्कामी येतात. त्यात यंदा शुक्रवार, शनिवार, रविवार सुटी असल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने आले होते.

मंदिर गाभारा व परिसरात बॅरिकेडिंग, आकर्षक फुलांची सजावट व रंगरंगोटी करण्यात आली होती. देवस्थानच्या नवीन रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, आमदार महेश लांडगे, पूर्वाताई वळसे पाटील, सुभाषराव मोरमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण सरपंच दत्तात्रय हिले, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, माजी सभापती संजय गवारी, आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक, देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, नायब तहसीलदार दामूराजे आसवले, अनंता गवारी, देवस्थान विश्वस्त मधुकरशास्त्री गवांदे, रत्नाकर कोडिलकर, विनायक कोडिलकर आदींनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news