हॉस्टन-टेक्सास : आपल्या आजवरच्या आयुष्यातील बहुतांशी वेळ तार्यांकडे पाहत आणि चंद्राकडे झेपावण्याचे स्वप्न पाहण्यात व्यतित करणार्या अंतराळवीर नोरा अल्मत्रोशीचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत असून 'नासा'च्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ती ग्रॅज्युएट होणारी पहिली अरब महिला ठरली आहे.
30 वर्षीय नोरा ही मेकॅनिकल इंजिनिअर असून तिने तेल उद्योगात काम केले आहे. यापूर्वी 2021 मध्ये संयुक्त अरब अमिरात अवकाश एजन्सीने 'नासा'च्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी दोन प्रशिक्षणार्थी अंतराळवीरांची निवड केली. यात नोराचा समावेश होता. आता दोन वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर नोरासह तिचा राष्ट्रीय सहकारी मोहम्मद अलमुल्ला व आणखी 10 जणांनी 'नासा'चा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला असून हे सर्व जण आता अंतराळ मोहिमांसाठी पात्र असणार आहेत.
12 जणांचा हा समूह 'द फ्लाईज' या नावाने ओळखला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावरील मोहिमा तसेच चंद्रांवरील मोहिमांमध्ये हे युवा अंतराळवीर आता सहभागी होऊ शकतात. तसेच मंगळावरील मोहीम निश्चित झाली तर त्यातही या अंतराळवीरांना आता संधी मिळू शकते.
दरम्यान, नोरा ही 'नासा'कडून ग्रॅज्युएट झालेली पहिली असली तरी अन्य काही अरब महिलांनी काही खासगी अंतराळ मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. यात सौदी बायोमेडिकल रिसर्चर रय्यनाह बर्नवी व इजिप्तियन-लेबॅनॅसे इंजिनिअर सारा साबरी यांचा समावेश आहे. बर्नवीने अॅक्सिओम स्पेस तर साराने 2022 ब्ल्यू ओरिजिन सबऑर्बिटल फ्लाईटच्या माध्यमातून आपले प्रतिनिधीत्व नोंदवले आहे.