

पुणे: गावच्या यात्रा-जत्रांमध्ये तंबू थिएटर उभारून चित्रपटांचा आनंद देणाऱ्या टुरिंग टॉकीजची ग्रामीण भागात एक वेगळी ओळख आहे. मात्र, बदलत्या काळानुसार मनोरंजनाची साधने वाढली, मल्टिप्लेक्सकडे प्रेक्षकांचा ओढा वाढला आणि तंबू थिएटरसमोरील आर्थिक अडचणीही गंभीर होत गेल्या. वाढता खर्च आणि त्या तुलनेत मिळणारे अपुरे उत्पन्न, यामुळे हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे.
तंबू उभारणे, चित्रपटांचे प्रदर्शन, वाहतूक खर्च आणि अन्य व्यवस्थापनासाठी होणारा खर्च परवडत नसल्याने व्यावसायिकांना व्यवसाय चालविणे कठीण झाले आहे. त्यातच सरकारकडून अपेक्षित आर्थिक मदत मिळत नसल्याने राज्यातील अनेक टुरिंग टॉकीज व्यावसायिकांनी यंदाच्या यात्रा-जत्रांच्या हंगामात व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तंबू थिएटरचे अस्तित्व टिकविण्यासाठी सरकारच्या मदतीची मागणी जोर धरू लागली आहे.
एकेकाळी गावातील यात्रा-जत्रांमध्ये टुरिंग टॉकीज उभारले, की चित्रपट पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी होत असे. हिंदी आणि मराठी चित्रपट पाहण्याचे हे एक प्रमुख माध्यम होते. अनेक दशकांपासून ग्रामीण भागात मनोरंजनाची गरज भागविणाऱ्या या व्यवसायाला आता अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. वाढते वीजबिल, विविध कर, कामगारांचे वेतन, जागेचे भाडे आणि चित्रपट वितरकांना द्यावे लागणारे शुल्क, यामुळे व्यवसायाचा खर्च वाढला आहे. त्यातच रात्रीचे चित्रपटांचे खेळ चालविण्यास पोलिसांकडून परवानगी मिळत नसल्याने उत्पन्नावरही मर्यादा येत आहेत.
सरकारने मदतीचा हात द्यावा
प्रत्येक टुरिंग टॉकीजचालकाला दरवर्षी दोन लाख रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी गेल्या तीन वर्षांपासून सरकारकडे केली जात आहे. यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला असून, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचीही भेट घेण्यात आली आहे. मात्र, अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. टुरिंग टॉकीज हा महाराष्ट्रातील जुना व्यवसाय असून, सरकारने मदतीचा हात द्यावा. आर्थिक पाठबळाअभावी व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आल्याने या पारंपरिक मनोरंजन माध्यमाचे भवितव्यही अनिश्चित बनले आहे, असे महाराष्ट्र टुरिंग टॉकीज संघाचे (तंबू सिनेमा ) सचिव संजय धाडवे यांनी सांगितले.
खर्चाचा भार पेलणे कठीण
टुरिंग टॉकीज व्यावसायिक मधुकर उबाळे (बुलडाणा) म्हणाले, “अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करीत आहे. मात्र, आता टुरिंग टॉकीज चालविणे कठीण झाले आहे. जात्रा-जत्रांमध्ये व्यवसाय करण्यासाठी ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो. आर्थिक परिस्थितीमुळे हा खर्च करणे अनेकांना परवडत नाही. त्यामुळे काहींनी व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पारंपरिक कलेला नवसंजीवनी देण्यासाठी सरकारने प्रत्येक टुरिंग टॉकीजचालकाला मदत करावी.”