किशोर बरकाले
पुणे : राज्य कृषी पणन मंडळाने यंदाच्या हंगामात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपियन देशांसाठी मिळून सुमारे अडीच हजार मे. टन आंब्यावर प्रक्रिया करून निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी ही माहिती दिली.
गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे ते म्हणाले. कोरोना साथीनंतर चालू वर्षी आंबा निर्यात अधिक व्हावी याद़ृष्टीने राज्य कृषी पणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्रांवरील सर्व सुविधा गतिमानतेने कार्यान्वित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. देशातून आंब्याची सुमारे पन्नास हजार मे. टनांपर्यंत निर्यात होत असते. त्यापैकी महाराष्ट्राचा सुमारे 35 ते 40 हजार मे. टन इतका वाटा राहतो. त्यामध्ये हापूस, केशर हा महाराष्ट्रातील, कर्नाटकातील बैंगनपल्ली आणि उत्तर प्रदेशातील दशहरी, चौसा आदी जातींच्या आंब्यांवर प्रक्रिया करून महाराष्ट्रातून आंबा निर्यात होतो. पणन मंडळ, अपेडा, कृषी विभागाच्या सहकार्याने भौगोलिक मानांकन प्राप्त आंब्याच्या निर्यातीसाठी सांघिक प्रयत्न सुरू आहेत.
परदेशी बाजारपेठेमध्ये चांगल्या पॅकिंगमध्ये एकसारखा आंबा निर्यात करणे आवश्यक असते. त्याचबरोबर फळांची प्रत चांगली असणे, फळांवर डाग नसणे, ओरखडे नसणे या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी 9 सुविधा केंद्रांमध्ये विविध प्रक्रिया करून हापूस व केशर आंबा निर्यात केला जातो, असेही पवार यांनी सांगितले.
जगामध्ये कोणत्या देशास आंबा निर्यात करावयाचा असल्यास त्या देशाच्या मागणीनुसार आंब्यावर कराव्या लागणार्या प्रक्रियेत प्रामुख्याने व्हेपर हीट ट्रीटमेंट, हॉट वॉटर ट्रीटमेंट, विकिरण सुविधांचा समावेश होतो. आयातदार देशांना हव्या असलेल्या प्रक्रिया करूनच आंबा निर्यात केला जात असल्याचे पवार यांनी सांगितले.
व्हेपर हीट ट्रीटमेंट : या सुविधेमध्ये आंब्यांमधील फळमाशीचे निर्मूलन करण्यासाठी उष्ण बाष्प प्रक्रिया केली जाते. आंबा अशा प्रक्रियेत पन्नास मिनिटे ठेवला जातो. तसेच आंबा दक्षिण कोरिया देशास निर्यात करताना व्हेपर हिट प्रक्रियेत 52 अंश सेल्सियस तापमानाला 3 मिनिटांची गरम पाण्याची प्रक्रिया करावी लागते.
हॉट वॉटर ट्रीटमेंट : फळमाशी निर्मूलनासाठी या सुविधेचा वापर केलेल्या आंब्यांची प्रामुख्याने युरोप, दक्षिण कोरिया, रशिया, मॉरिशियस, चीन या देशांना आंबा निर्यात होते. त्यामध्ये आंब्याला 48 अंश सेल्सियस तापमानातील पाण्यात 60 मिनिटांसाठीची प्रक्रिया करावी लागते.
विकिरण सुविधा : या सुविधेद्वारे आंब्यांमधील कोय किडा आणि फळमाशीचे निर्मूलन करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानावर आधारित विकिरण सुविधा वापरली जाते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया येथे आंबा निर्यात करताना विकिरण प्रक्रियेत 52 अंश सेल्सियस तापमानात 3 मिनिटांची गरम पाण्याची प्रक्रिया करावी लागते.