

पुणे: फेबुवारी-मार्च 2026 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीच्या 23 जानेवारी ते 18 फेबुवारीदरम्यान तर दहावीची 2 फेबुवारी ते 28 फेबुवारी दरम्यान परीक्षा घेण्यात येणार असल्याचे मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ.माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांकनिहाय ऑनलाइन पध्दतीने नोंदविलेल्या गुणांची अंतिम यादी घेऊन त्यावर अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांची स्वाक्षरी व तोंडी, अंतर्गत मुल्यमापन, श्रेणी इत्यादी गुणतक्त्यानुसार संबंधित विषय शिक्षकांची स्वाक्षरी घेऊन संबंधित गुणतक्त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी स्वाक्षरी करून संबंधित गुणतक्ते विभागीय मंडळाकडे निर्धारित तारखेस प्रचलित पध्दतीप्रमाणे सिलबंद पाकिटामध्ये, पाकिटावर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव, घालून तक्त्यात नमूद केल्यानुसार निर्धारित तारखेस विभागीय मंडळाकडे जमा करायचे आहेत.
अतिविलंब शुल्काच्या मुदतीमध्ये आवेदनपत्र भरलेल्या व या गुणांच्या ऑनलाइन सिस्टिममध्ये ज्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध झालेले नाहीत अथवा विद्यार्थ्यांनी ऐनवेळी विषय बदल केला आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे गुण प्रचलित पध्दतीने निर्धारित तारखेस विभागीय मंडळामध्ये जमा करावयाचे आहेत.
गतवर्षीप्रमाणेच सर्व विभागीय मंडळांनी फेबुवारी-मार्च 2026 च्या परीक्षेसाठी ’आऊट ऑफ टर्न’ ने आयोजित करावयाच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व तत्सम परीक्षा संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच आयोजित करण्यात याव्यात. नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिलेले आहेत अशाच विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक ’आऊट ऑफ टर्न’ परीक्षेसाठी ज्या त्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना उपलब्ध करून दिले जातील. संबंधित विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाइन पध्दतीने ’आऊट ऑफ टर्न’ या पर्यायाव्दारे नोंदविण्याची कार्यवाही माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी करायची आहे.
गुणांसंदर्भातील सर्व बाबी सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात. तसेच ऑनलाइन पध्दतीने गुण भरून मंडळाकडे कशाप्रकारे पाठवावयाचे आहेत. याबाबतच्या सर्वसाधारण सूचना सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्याबाबत कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळ कार्यालयास सादर करावा असे देखील डॉ. माळी यांनी स्पष्ट केले आहे.