

पुणे: गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत राहिलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत परिवर्तन उत्कर्ष आणि साहित्य संवर्धन या दोन आघाड्यांमध्ये झालेल्या अटीतटीच्या चुरशीत अखेर साहित्य संवर्धन आघाडीने बाजी मारली. दहा वर्षांनंतर परिषेदत सत्तापालट झाला असून, साहित्य संवर्धन आघाडीने परिवर्तन घडविले. मसापच्या अध्यक्षपदी साहित्य संवर्धन आघाडीचे उमेदवार लेखक- अभिनेते योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदी पत्रकार स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्षपदी गझलकार प्रदीप निफाडकर यांनी रविवारी (दि.15) विजय मिळवला. तर, या निवडणुकीत परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचा पराभव झाला आहे. सोमण हे आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचेही अध्यक्ष असतील.
टिळक रस्त्यावरील साहित्य परिषदेच्या कार्यालयात मतमोजणीला रविवारी सकाळी साडेअकरा वाजता सुरुवात झाली. रात्री दहा वाजता निकाल जाहीर करण्यात आला. साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र असलेल्या पुण्यासह अकरा जिल्ह्यांत ‘मसाप’चे 16 हजार 607 मतदार होते. यापैकी 10 हजार 901 सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. विद्यमान कार्यकारिणीचे परिवर्तन उत्कर्ष आघाडी आणि साहित्य संवर्धन आघाडीमध्ये चुरस रंगली होती.
प्रत्येक फेरीदरम्यान कुणाला किती मते पडली, हे शेवटच्या क्षणापर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. सोमण यांना 5365, तर मिलिंद जोशी यांना 5320 मते पडली. केवळ 45 मतांनी सोमण विजयी झाले. तसेच, स्वाती महाळंक यांना 5414 आणि सुनीताराजे पवार यांना 5285 इतकी मते पडली. कोषाध्यक्षपदी प्रदीप निफाडकर यांना 5536, तर विनोद कुलकर्णी यांना 5168 मते पडली. तिन्ही पदांमध्ये निफाडकर सर्वाधिक 368 मतांची आघाडी घेत विजयी झाले.
स्थानिक कार्यवाह या सात पदांच्या निवडणुकीत सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, प्रसाद मिरासदार आणि नितीन संगमनेरकर (साहित्य संवर्धन आघाडी), तसेच अंजली कुलकर्णी, माधव राजगुरू आणि डॉ. आशुतोष जावडेकर (परिवर्तन उत्कर्ष आघाडी ) यांचा विजय झाला. निवडणुकीत 10 हजार 901 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यातील 10713 मते वैध आणि 188 मते अवैध ठरली. सुरुवातीला पुणे जिल्हा प्रतिनिधिपदासाठीची मतमोजणी घेण्यात आली. पुणे जिल्हा प्रतिनिधिपदी राजन लाखे, पुरुषोत्तम काळे, प्रभाकर ओव्हाळ हे विजयी झाले. त्यानंतर सात स्थानिक कार्यवाहपदासाठीची, तसेच प्रमुख तीन पदांसाठीची मतमोजणी करण्यात आली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीने 2021 मध्ये कोरोनाचे कारण देऊन सर्वसाधारण सभेत निवडणुकीऐवजी पाच वर्षांसाठी मुदतवाढ घेतली. यापूर्वी साहित्य परिषदेची निवडणूक 2016 मध्ये झाली होती. मुदतवाढीमुळे विद्यमान कार्यकारिणीकडे दहा वर्षे परिषदेच्या कारभाराची सूत्रे होती.
मसापची 2026 - 2031 वर्षांसाठीची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया गेल्या तीन महिन्यांपासून सुरू होती. रविवारी सकाळी साडेअकरा वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, प्रत्येक फेरीदरम्यान कुणाला किती मते पडली, कोणते पॅनेल आघाडीवर हे शेवटच्या क्षणापर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. सुरुवातीला पुणे जिल्हा आणि शहर प्रतिनिधिपदासाठीची मतमोजणी घेण्यात आली. मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान, परिषदेच्या पहिल्या मजल्यावरील कोहिनूर सभागृहात परिषदेच्या अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या तीन प्रमुख पदांसाठी मतमोजणी सुरू होती.
सुरुवातीपासून साहित्य संवर्धन आघाडीचे वर्चस्व मतमोजणीत दिसून आले. त्यामुळे परिवर्तन उत्कर्ष पॅनलमध्ये अस्वस्थता दिसून आली. अखेर साहित्य संवर्धन आघाडीने परिवर्तन घडविले आणि विद्यमान कार्यकारिणीची सत्ता संपुष्टात आली. निकाल जाहीर होताच मसापच्या कार्यालयाच्या ठिकाणी विजयी उमेदवारांनी जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा करण्यात आला. निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले आहे. प्रमुख तीन पदांवर साहित्य संवर्धन आघाडीने बाजी मारल्याचा आनंद आहे. त्याप्रमाणे आमच्या पॅनेलमधील चार उमेदवार स्थानिक कार्यवाहपदी निवडून आले आहेत. या विजयाचे श्रेय सर्वांना जाते. माझी अध्यक्षपदी निवड झाल्याचा आनंद आहे. ज्यांनी परिवर्तन घडण्यासाठी आमच्यासोबत काम केले, हा विजय त्या सगळ्यांचा आहे.
योगेश सोमण, नवनिर्वाचित अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद