

पुणे: गोड-आंबट चवीचे द्राक्षे म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा द्राक्षांचा हंगाम बहरल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात मोठ्या प्रमाणात द्राक्षे दाखल होऊ लागली आहे. उन्हाच्या चटक्याने द्राक्षांना गोडी आली असून, मागणीतही वाढ झाली आहे. घाऊक बाजारात 15 किलोच्या क्रेटसला 700 ते 1 हजार 300 रुपयांचा भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात 120 ते 180 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी (दि. 18) 40 ते 45 टन द्राक्षांची आवक झाली. सांगली आणि नाशिक जिल्ह्यातून ही आवक झाली. साधारणपणे नोव्हेंबर अखेरपासून द्राक्षे बाजारात दाखल होतात. यंदा मात्र पाऊस लांबल्याने त्याचा परिणाम हंगामावर झाला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा एक महिना उशिरा द्राक्षांची आवक सुरू झाली आहे. लहरी हवामानामुळे यंदा द्राक्षाचे पीक 30 टक्केच आले आहे. त्यात हंगाम बहरल्याने सध्या आवक वाढली आहे.
बाजारात दाखल झालेल्या मालाची शहरातील विक्रेत्यांसह महाबळेश्वर, लोणावळा या पर्यटन क्षेत्रातील विक्रेते आणि गुजरात, अहमदाबाद येथील व्यापारी खरेदी करण्यास प्राधान्य देत आहे. पोषक वातावरणामुळे दर्जा चांगला आहे. सद्य:स्थितीत सांगली व नाशिक येथून आवक होत आहे. यामध्ये सुपर सोनाका, सोनाका, माणिकचमन आणि तास-ए-गणेश आदी द्राक्षांचा समावेश आहे. सध्या द्राक्षांचे दरही उतरले असून, गोडी आल्याने द्राक्षे खाण्याची वेळ असल्याचेही द्राक्षांचे व्यापारी अरविंद मोरे यांनी नमूद केले.