

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर आता साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना वेध लागले आहेत ते महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे. मसापच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून, परिषदेच्या 21 जागांसाठी इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे. परिषदेच्या नवीन घटनेनुसार ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, विविध पदांसाठी सुमारे 170 अर्ज वितरीत झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी ॲड. प्रताप परदेशी यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील बोगस मतदान टाळण्यासाठी नियमावली तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक नेहमीच चर्चेचा विषय राहिलेली आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील प्रत्येकाचे या निवडणुकीकडे लक्ष लागलेले असते. परिषदेच्या घटनेनुसार दर पाच वर्षांनी कार्यकारी मंडळाची निवडणूक होणे बंधनकारक आहे. परिषदेची शेवटची निवडणूक 2016 मध्ये झाली होती. परिषदेची विद्यमान कार्यकारिणी 2016 मध्ये निवडून आल्यानंतर 2021 मध्ये या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला. मात्र, कोरोना काळात निवडणूक घेण्यासारखी परिस्थिती नसल्यामुळे या कार्यकारिणीने वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मतदानाने पाच वर्षांची मुदतवाढ घेतली होती. ती मुदतवाढ 31 मार्च 2026 रोजी संपणार आहे. दहा वर्षांनी परिषदेची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे. नवीन घटनेनुसार परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडत आहे. पूर्वी अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जात नव्हती. मात्र, नवीन घटनेनुसार परिषदेचे कार्याध्यक्षपद काढून टाकण्यात आले असून, अध्यक्षपदासह इतर पदांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. यात 75 वर्षांवरील व्यक्तींना निवडणूक लढविता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची बेकायदेशीर पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याबाबत परिषदेचे आजीव सदस्य राजकुमार धुरगुडे पाटील यांनी निवडणूक अधिकारी ॲड. प्रताप परदेशी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मसापच्या मतदार यादीतून अनेक आजीव सदस्यांची नावे वगळण्यात आली असून, ही यादी सदोष आणि अपूर्ण असल्याच्या गंभीर तक्रारी असूनही, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप त्यांनी नोटीसमध्ये केला आहे.
आजीव सदस्यांना 5 फेबुवारीपासून मतपत्रिका पोस्टाने पाठविल्या जाणार निवडणूक अधिकाऱ्यांकडून 19 ते 22 जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जांची छाननी होऊन वैध उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी असून, उमेदवारांची अंतिम यादी 27 जानेवारी रोजी जाहीर केली जाणार आहे. 5 फेबुवारीपासून मतदानास पात्र आजीव सदस्यांना मतपत्रिका पोस्टाने पाठविल्या जाणार आहेत, त्यांनी मतदान करून त्या 13 मार्चपर्यंत परत पाठविण्याची मुदत आहे. 15 मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणूक पार पाडण्यासाठी निर्वाचन मंडळातील सहायक निवडणूक अधिकारी गिरीश केमकर, संजीव खडके आणि प्रभा सोनवणे सहकार्य करीत आहेत.