

जेजुरी : खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीची ग्रामदेवता जानाईदेवाची जत्रा तब्बल दीडशे वर्षांनंतर साजरी होत आहे. चैत्र महिन्यातील अष्टमीला (10 एप्रिल) मुख्य जत्रा साजरी करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला.
नेहमी भरणाऱ्या यात्रांमुळे ग्रामदैवता जानाई देवीची यात्रा काळाच्या ओघात मागे पडली. आता दीडशे वर्षांनंतर पुन्हा ग्रामदेवतेची जत्रा भरणार आहे. त्यामुळे जेजुरी व पंचक्रोशीतील नागरिकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जेजुरी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या होळकर तलावाकाठी ग्राम दैवता जानाई देवीचे मंदिर आहे. जुने मंदिर सुमारे चार कोटी रुपये खर्च करून नव्याने उभारण्यात आले आहे. गतवर्षी मंदिराचे कलशारोहण करण्यात आले. जानाई देवीचे मूळ स्थान सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील निवकने येथील डोंगर खोऱ्यात आहे. दरवर्षी जेजुरीतून देवीची पालखी सोहळा निवकणे येथे जातो. तेथे जत्रा साजरी केली जाते. मात्र, ग्रामदेवतेची जत्रा साजरी होत नसल्याने ही यात्रा साजरी साजरी करण्याचा निर्णय जेजुरी ग्रामस्थांनी घेतला. या जत्रेच्या नियोजनाच्या निमित्ताने जानाई देवी मंदिरात बैठक पार पडली.
यावेळी नगराध्यक्ष जयदीप बारभाई, देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, ग्रामदैवता जानाई देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर गोडसे, श्री खंडोबा पालखी सोहळा पालखी समिती खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, पदाधिकारी राजेंद्र पेशवे, गणेश आगलावे, छबन कुदळे, रोहिदास माळवदकर, संतोष खोमणे, विजय झगडे, कृष्णा कुदळे, पंडित हरपळे, माणिक पवार, रामदास माळवदकर आदी उपस्थित होते. 10 एप्रिलच्या दरम्यान तीन दिवस या जत्रा उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.