

विशाल शिर्के
पुणे: अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी खासगी गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन केंद्र सरकार व भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) केले जात आहे. आर्थिक वर्ष 2024-15मध्ये देशात 2 लाख 20 हजार 132 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, त्यात गुजरातचा वाटा सर्वाधिक 21.4 लाख कोटी रुपये असून, महाराष्ट्राचा वाटा 15.1 टक्के आहे.
बँका, वित्तीय संस्था, कर्जरोखे, शेअर बाजार अथवा वित्तीय संस्थाबाह्य गुंतवणुकीद्वारे उभारलेल्या निधीचा यात विचार करण्यात आला आहे. याशिवाय 10 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक यात ग्राह्य धरण्यात आली आहे. (Latest Pune News)
आर्थिक वर्ष 2024-25मध्ये खासगी कंपन्यांनी 4 लाख 14 हजार 923 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. बँकांसह वित्त उभारणीच्या सर्व प्रकारांचा विचार केल्यास खासगी कंपन्यांनी 2024-25मध्ये 2 लाख 20 हजार 132 कोटी रुपये खर्च केले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) प्रसिद्ध केलेल्या बुलेटिनमधून ही आकडेवारीसमोर आली आहे.
आर्थिक वर्ष 2024-25मध्ये 1 हजार 584 खासगी प्रकल्पांनी विविध माध्यमातून निधी उभारला. त्यातील 21.4 टक्के प्रकल्पांना बँका, वित्तीय संस्थांनी मंजुरी दिलेली आहे. याशिवाय काही प्रकल्पांनी बाह्यस्त्रोत अथवा शेअर बाजाराच्या माध्यमातून पैसे उभारले आहेत.
आर्थिक वर्षात 2.67 लाख कोटींची गुंतवणूक
फेब्रुवारी महिन्यापासून रेपोदरात एक टक्का कपात झाल्याने कर्ज त्याप्रमाणात स्वस्त झाली आहेत. कॉर्पोरेट कंपन्या आणि बँकांचा सुधारलेला ताळेबंद, महागाई निर्देशांकात झालेली घट, सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) 6.5 टक्क्यांच्या आसपास राहण्यासारखी स्थिती यामुळे 2025-26मध्ये खासगी भांडवली खर्च 2.67 लाख कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे.
असे उभारले पैसे
आर्थिक वर्ष 2024-25मध्ये 1,584 प्रकल्पांनी विविध माध्यमातून निधी उभारला. त्यात 907 प्रकल्पांना बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज मंजूर करण्यात आले. या कंपन्यांच्या प्रकल्पाचे एकूण मूल्य 3 लाख 67 हजार 973 कोटी रुपये होते. तर, 448 प्रकल्पांना वित्तीय संस्थाबाह्य प्रकारातून 96 हजार 966 कोटी रुपये उभारले. तर, 229 कंपन्यांनी 32,295 कोटी रुपये शेअर बाजाराच्या माध्यमातून उभारले.
या क्षेत्रांमध्ये अधिक गुंतवणूक
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये झालेल्या 2 लाख 20 हजार 132 कोटी पैकी 39.7 टक्के गुंतवणूक ऊर्जाक्षेत्रात झाली आहे. खालोखाल रस्ते, पूल यांसारख्या पायाभूत क्षेत्राचा वाटा 8.9, रसायने आणि कीटकनाशक प्रकल्पात 7.9, बांधकाम 5.6, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स 4.6, धातू आणि धातू उत्पादने 4.6 आणि आयटीमध्ये 3.9 टक्के गुंतवणूक झाली आहे.