

सोमेश्वरनगर: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन 2024-25 या हंगामात गाळप झालेल्या उसाला 3400 रुपये प्रतिटन अंतिम दर देण्याचा निर्णय घेतला. उच्चांकी दर देण्याची परंपरा कारखान्याने कायम राखली आहे.
गेटकेनधारकांसाठी 3200 रुपये प्रतिटन दर जाहीर करण्यात आला आहे. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या गुरुवारी (दि. 28) झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. (Latest Pune News)
या वेळी जगताप यांच्यासह उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव आणि संचालक मंडळ उपस्थित होते.
हंगाम संपल्यानंतर टनाला 373 रुपये देण्यात आले असून, आत्तापर्यंत सभासदांना टनाला 3173 रुपये अदा करण्यात आले होते. गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत गत वर्षीच्या उसाला टनाला 3400 रुपये दर जाहीर करण्यात आला आहे.
उर्वरित राहिलेले 227 रुपयांमधून वार्षिक सभेत सभासदांनी कपातीला परवानगी दिल्यानंतरच शिक्षण निधी म्हणून प्रतिटन 20 रुपये व सोमेश्वर देवस्थानसाठी टनाला 1 रुपया असे 21 रुपये कपात केले जाणार आहेत. उर्वरित 206 रुपये दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली. बिगरसभासदांना आजवर प्रतिटन 3173 रुपये अदा केले असून, उर्वरित 27 रुपये दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कारखान्याच्या कामकाजात वेळोवेळी बारीक गोष्टींवर देखील असणारे लक्ष व त्यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण, यामुळे सोमेश्वर कारखाना ऊसदराची परंपरा कायम राखू शकला, याचा आनंद आहे. त्याबरोबरच कारखान्याची विस्तारवाढ, को-जनरेशनची विस्तारवाढ वेळेत पूर्ण केलेली असून, विस्तारवाढीतून मिळालेला अधिकचा नफा व सह उत्पादनाच्या मदतीने हा दर देता आला.
- पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना