

Maharashtra Rain Alert
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पालघर जिल्हा तसेच नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या घाट क्षेत्रात आज गुरुवारी (दि. १९ जून) अतिवृष्टीची शक्यता व्यक्त रेड अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा जिल्ह्यातील घाट क्षेत्राला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
विशेषतः पुणे जिल्ह्यातील घाट क्षेत्रात पुढील चार दिवस पावसाचा जोर अधिक राहणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्राला पुढील चार दिवस जोरदार पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे. राज्यातील उर्वरित भागात पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम पाऊस राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासांकरिता मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट (Pune rain), सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
दरम्यान, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील किनारपट्टीवर आज (दि.१९ जून) रात्री ११:३० वाजेपर्यंत ३.५ ते ३.८ मीटर उंच लाटा उसळू शकतात. या दरम्यान लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा तसेच किनारपट्टीजवळील पर्यटन आणि जलक्रीडा थांबविण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. कोकणात सामान्यपेक्षा जास्त पाऊस, तर मध्य महाराष्ट्रात सामान्य पाऊस पडला आहे. मे महिन्यात मेघगर्जनेसह अंतर्गत भागात चांगला पाऊस झाला. मराठवाडा, विशेषतः विदर्भात अद्याप चांगला पाऊस व्हायचा आहे. पण अंदाज सकारात्मक आहेत, असे हवामान तज्ज्ञांनी म्हटले आहे.
राज्यात मागील २४ तासांमध्ये (१९ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई शहर जिल्ह्यात १४२.६ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात १३४.१ मिमी, पालघर १२०.९ मिमी, ठाणे ९०.३ मिमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ६०.५ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात कालपासून आज १८ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) : ठाणे ९०.३, रायगड १३४.१, रत्नागिरी ६०.९, सिंधुदुर्ग ९.४, पालघर १२०.९, नाशिक ४०.३, धुळे २५.५, नंदुरबार ३३.४, जळगाव ४.७.
अहिल्यानगर ८.७, पुणे २९.३, सोलापूर ०.३, सातारा १७.७, सांगली ५.९, कोल्हापूर १२.१, छत्रपती संभाजीनगर ४.५, जालना २.१, बीड ०.२, धाराशिव ०.२, नांदेड ०.६, परभणी ०.५, हिंगोली ०.८, बुलढाणा ३.१, अकोला ८.६, वाशिम १.७ अमरावती ५.९, यवतमाळ १.२, वर्धा ३.२, नागपूर ०.७, भंडारा ०.३,चंद्रपूर ४.३ आणि गडचिरोली जिल्ह्यात ०.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती जखमी तर सोलापूर जिल्ह्यात इलेक्ट्रिक पाळणा तुटून एका व्यक्तीचा मृत्यू आणि दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील अंबा आणि कुंडलिका नदीने धोका पातळी आणि पाताळगंगा नदीने इशारा पातळी पार केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी पार केली असून. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये यांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील नारुर गावातील हातेरी नदीवरील रस्ता वाहून गेला आहे. जवळील लोखंडी पूलावरून नागरिकांचे दळणवळण चालू आहे. मौजे कुचंबे (ता. संगमेश्वर) येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने तहसीलदार संगमेश्वर यांच्यामार्फत योग्य कार्यवाही करून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.