

Pune Mumbai Dam Water Level
पुणे : शिवाजी शिंदे
राज्यातील सर्वच भागात मे महिन्याच्या अंतिम टप्प्यात तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. तरी देखील सुमारे 29 धरणांमध्ये शून्य ते 15 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यातही पावसाचा प्रदेश अशी ख्याती असलेल्या पुणे जिल्ह्यातील पाच धरणांमध्ये पाणीसाठ्यांची स्थिती गंभीर आहे. अशीच स्थिती छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड जिल्हा तसेच नाशिक विभागात आहे. त्यानुसार अनुक्रमे बीड आणि नाशिक जिल्ह्यात पाच आणि सहा धरणांमधील पाणीसाठयाची स्थिती चिंताजनक आहे. यामुळे राज्यात काही भागातच भरपूर पाऊस पडला असल्याचे धरणांमधील पाणीसाठ्याच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.
दरम्यान, राज्यातील सर्वच विभागात असलेल्या धरणामध्ये सध्या एकूण 31.77 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, तो मागील वर्षीच्या तुलनेत (मागील वर्षीची आकडेवारी 20.02 टक्के) सुमारे 11 टक्क्यांनी जास्त आहे.
राज्यात जलसंपदा विभागाचे सहा विभाग आहेत. यासहा विभागात मोठी, मध्यम आणि लहान अशी मिळून 2 हजार 997 धरणे आहेत. त्यात नागपूर विभाग 383, अमरावती विभाग 264, छत्रपती संभाजीनगर विभाग 920, नाशिक विभाग 537, पुणे विभाग 720, कोकण विभाग 173 अशी आहेत.
जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीत राज्यातील पुणे विभागात इतर विभागापेक्षा कमी म्हणजेच 29.41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातही घाटमाथ्याजवळ असलेल्या पिंपळगाव जोगे, माणिकडोह, भाटघर, टेमघर, खडकवासला या पाच धरणामधील पाणीसाठा पूर्णपणे तळाला गेला आहे. याबरोबरच छत्रपती संभाजीनगर भागात असलेल्या बीड जिल्ह्यातील बोरगाव- अंजनपूर, माजलगाव, मांजरा, सिरसमार्ग, वांगदरी, या धरणामधील पाणीसाठा अत्यंत खाली गेला आहे.
वास्तविक पाहता मे महिन्यात यावर्षी न भूतो न भविष्यती म्हणीप्रमाणे अतिमुसळधार पाऊस सर्वच भागात झालेला आहे .त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत येत असताना येणारा पाण्याचा येवा ( पाणी धरणांमध्ये साठण्यासाठी घाटमाथ्यावरून येणारे पाणी ) जास्त होता. मात्र हा पाऊस विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग, मध्यमहाराष्ट्राचा काही भाग आणि कोकणात सर्वात जास्त बसरला. त्यामुळे या भागातील बहुतेक सर्वच धरणांची पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे.मात्र उर्वरित भागात असलेल्या धरणाची पाणीपातळीमध्ये फारशी वाढ झाली नसल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.
राज्यातील 15 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असलेल्या धरणांची यादी (जिल्हा आणि त्या जिल्ह्यामधील धरणांची नावे आणि शिल्ल्क पाणीसाठा टक्केवारीत)
- भंडारा :-बावनथडी—-.000 टक्के
-गोंदिया :-धापेवाडा- 3.43, कालीसरार- 0.35, सिरसपूर -2.60
- नागपूर :- नांद -9.91
- अकोला : काटेपूर्णा- 13.61
-अमरावती :- खडकपूर्णा- 0.00
-बीड :- बोरगव- अंजनपूर -0.00,माजलगाव- 12.21 , मांजरा - 2.70, सिरसमार्ग- 5.34, वांगदरी- 7.14
- धाराशिव : - तागरखेडा-9.9
-लातूर :- कारसा पोहेरेगाव -6.45. साई-0.00
-नाशिक:- भाम- 8.50, कडवा- 15, करंजवण - 12.33, पुणेगाव-0.00, तिसगाव -2.19, वाघाड- 6.72
-कोल्हापूर :- तिल्लारी - 6.5
-पुणे :- पिंपळगाव जोगे- 0.00, माणिकडोह - 5.70, भाटघर- 7.61, खडकवासला- 13.42, टेमघर - 4.39