आळंदी: आळंदीजवळच्या धानोरे फाटा भागात विषबाधा झाल्याने मेंढपाळाच्या 26 शेळ्या-मेंढ्या दगावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील कंपनीतून लगतच्या शेतात मिसळणारे केमिकलमिश्रित पाणी पिल्याने विषबाधा होऊन या शेळ्यामेंढ्या दगावल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अद्याप विषबाधेचे नेमके कारण समजू शकले नाही. मृत शेळ्या- मेंढ्यांचे पोस्टमार्टम करून ब्लड व ऑर्गन सॅम्पल घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
त्याचा अहवाल आल्यावरच मृत्यूचे खरे कारण समजू शकेल, अशी माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मेंढपाळ संतोष मारुती ठोंबरे हे आपल्या दोनशे मेंढ्यांच्या कळपासह शुक्रवारी (दि.13) दुपारच्या सुमारास मरकळ रस्त्याने आळंदीच्या दिशेने प्रवास करत आले. या दरम्यान धानोरे फाट्यावर मेंढ्या अधिक वेळ लगतच्या शेतात चरल्या. (Latest Pune News)
धानोरे फाट्यावरच त्यांनी रात्रीची पाल टाकली. यादरम्यान मेंढ्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी मरकळ पशुवैद्यकीय दवाखान्यात धाव घेतली. मात्र, येथील डॉक्टरांनी मी बाहेर असल्याचे सांगितले. त्यानंतर ठोंबरे यांनी मेडिकलमधून औषधे घेत प्राथमिक उपाय केला. मात्र, रात्रीच्या सुमारास 26 मेंढ्या दगावल्या, अजूनही 8 मेंढ्या अत्यवस्थ असल्याचे ठोंबरे यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.
दरम्यान मृत शेळ्यांमध्ये चार ते पाच बोकड आहेत. त्यांना ईदला कुर्बानीला मागत होते, मात्र विकले नाहीत, असे ठोंबरे यांनी सांगितले. आता त्या बोकडांचा मृत्यू झाल्याने ठोंबरे यांचे लाखोंचे नुकसान झाले.
मृत मेंढ्यांचे ब्लड व ऑर्गन सॅम्पल फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यावरच मेंढ्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकेल. प्राथमिक अंदाजात नायट्रेट पॉयजेनिंग झाल्याचे जाणवत आहे.
- डॉ. वीणा कोडलकर, पशुधन विकास अधिकारी, आळंदी