

Thane Municipal Corporation Water Cut
ठाणे : ऐन पावसाळ्यात ठाणे शहरात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून 18 आणि 19 जून या दोन दिवसांमध्ये स्टेम प्राधिकरणाकडून तब्बल 12 तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. अत्यावश्यक दुरुस्तीसाठी हा शटडाऊन घेण्यात येणार असून त्यामुळे ठाण्यातील काही महत्वाच्या भागांचा पाणीपुरवठा 12 तास बंद राहणार असल्याने ऐन पावसाळ्यात ठाणेकरांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे 18 जून रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद रहाणार आहे.या काळात, ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचे व्यवस्थापन करुन टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार, घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवार नगर, कोठारी कम्पाउंड, आझाद नगर, डोंगरीपाडा, वाघवीळ, आनंद नगर, कासारवडवली, ओवळा इत्यादी ठिकाणाचा पाणी पुरवठा गुरुवार 19 जून रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच, समता नगर, ऋतु पार्क, सिध्देश्वर, ईटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा व मुंब्रा येथील काही भागांचा पाणीपुरवठा रात्री 9 ते 20 जून रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी टप्याटप्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा. तसेच, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.