

पुणे : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आहे. या असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी खो खो असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी अर्ज दाखल केला असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ हे सुध्दा अर्ज भरणार आहेत.(Latest Pune News)
संघटनेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. आतापर्यंत अजित पवार तीन वेळा अध्यक्षपद म्हणून कार्यरत राहिले आहेत. आता ते चौथ्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत अर्ज भरण्याची अंतिम तारीख ११ ऑक्टोबर आहे. अजित पवार यांनी २०१३ पासून महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्षपद भूषवले आहे.
अजित पवारांनी महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेकरवी ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला आहे. २००६ ते २०१८ यादरम्यान महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. सात वर्षांचा कुलींग ऑफ पीरियड झाल्यानंतर २०२५ मध्ये ते पुन्हा राज्य खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. दरम्यान राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्षपदी कार्यरत असणारी संघटना न्यायालयात गेल्याने अजित दादांनी खो खो संघटनेचे अध्यक्ष पद स्वीकारले. आता खो खो संघटने मधून ते ऑलिम्पिक च्या अध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत.
जाधव, शिरोळे यांचा ही अर्ज
महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्यासह इतर व्यक्तींनीही अर्ज दाखल केला. यामध्ये चंद्रजीत जाधव, प्रदीप गंधे, स्मिता शिरोळे, संजय वळवी, बाबुराव चांदेरे, मनोज भोरे, संदीप ओंबासे व रणधीर या व्यक्तींचा समावेश आहे. चंद्रजीत जाधव यांनी खजिनदार व सरचिटणीस या दोन पदांसाठी अर्ज दाखल केला आहे.