

पुणे : अलीकडच्या काळात अतिवृष्टी, पूर परिस्थिती, दुष्काळ, युद्ध, अंतर्गत संघर्ष अशा संकटांनी जगभरातील अनेक समुदायांवर परिणाम केला आहे. या परिस्थितीत शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आणि सामाजिक आधाराची आवश्यकता अधिक भासते. आपत्तीग्रस्त लोकांना औषधोपचार, अन्न, निवारा इतकाच मानसिक आधारही अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.(Latest Pune News)
मानसिक आरोग्याशिवाय सर्वांगीण आरोग्य शक्य नाही, असा संदेश देत दर वर्षीप्रमाणे यंदाही 10 ऑक्टोबर रोजी ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ साजरा करण्यात येत आहे. यावर्षी जागतिक मानसिक आरोग्य महासंघाने ‘आपत्ती आणि आणीबाणीच्या परिस्थितीत मानसिक आरोग्यसेवांचा प्रवेश’ ही थीम जाहीर केली आहे.
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक मोहन बनसोडे म्हणाले, ‘आपत्तीच्या काळात पाचपैकी एका व्यक्तीला चिंता, नैराश्य, तणाव यांसारख्या मानसिक विकारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा काळात मानसिक आरोग्यसेवा उपलब्ध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. संकटात मानसिक आधार दिल्यास अनेक जीव वाचतात आणि व्यक्तीला पुन्हा उभे राहण्याचे बळ मिळते. यासाठी सरकार, आरोग्य संस्था, एनजीओ यांनी मानसिक आरोग्यसेवांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे.’
मानसोपचार तज्ज्ञांचे आवाहन
मानसिक आरोग्य हे मानवी हक्कांचा आणि आपत्कालीन तयारीचा अविभाज्य भाग आहे. संकटाच्या काळात कोणीही मानसिक आरोग्यापासून वंचित राहू नये, हीच या दिवसाची खरी जाणीव आहे. त्यादृष्टीने आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे.
मोहन बनसोडे, समाजसेवा अधीक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय
आपत्तीग्रस्तस्त भागात मानसिक आरोग्याविषयी जागरूकता मोहिमा राबवणे आवश्यक असते. मानसिक आरोग्याशी संबंधित गैरसमज दूर करण्यासाठी स्थानिक माध्यमे, स्वयंसेवी संस्था आणि धार्मिक नेत्यांचा सहभाग असल्यास समस्येशी लढणे सोपे जाते. मुले, महिला, वृद्ध आणि अपंग अशा संवेदनशील गटांवर विशेष लक्ष ठेवणे अपेक्षित असते.
डॉ. प्रणाली सातपुते, मानसोपचारतज्ज्ञ
आपत्ती काळात मानसिक आरोग्य सेवा कशी मजबूत करता येईल?
राष्ट्रीय / राज्य आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात मानसिक आरोग्याचा समावेश करणे.
प्रत्येक जिल्ह्यात मानसिक आरोग्य आपत्कालीन प्रतिसाद योजना तयार करणे.
आरोग्य मंत्रालय, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वयाची यंत्रणा तयार करणे.
मानसिक आरोग्य तज्ज्ञ, समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे जाळे तयार करणे.
मोबाईल मानसिक आरोग्य युनिट्स तयार करून पूर, दुष्काळ, भूकंपग्रस्त भागात तात्काळ सेवा पुरवणे.
आपत्ती काळात टोल-फी हेल्पलाईन, ऑनलाइन काउंसिलिंग, आणि टेली-मेन्टल हेल्थ सेवा सुरू ठेवणे.
प्राथमिक आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, शिक्षक, पोलीस, स्वयंसेवक यांना मानसिक आजारांवतील प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण देणे.
स्थानिक पातळीवर समुपदेशन केंद्रे सुरू करणे.