

पुणे: यंदाचा मान्सून हंगाम संपत आला असून, तो निरोप घेण्याच्या तयारीला लागला आहे. साधारणपणे १७ सप्टेंबरदरम्यान तो पूर्व राजस्थानातून, तर महाराष्ट्रातून सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात माघारी जाईल, असा अंदाज आहे. सप्टेंबरमध्ये केवळ ९१ टक्केच पावसाचा अंदाज असल्याने तापमानात मोठी वाढ होणार असल्याचे संकेत हवामान शास्त्रज्ञांनी दिले आहेत.
यंदा सप्टेंबरमध्येही पाऊस सरासरीपेक्षा खूप कमी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने ३१ ऑगस्ट रोजी दिला. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊन सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटचा तडाखा सुरू होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनचा सप्टेंबरचा अंदाज जाहीर केला. त्यात सप्टेंबर महिन्यात तापमानात मोठ्या वाढीचे संकेत दिल्याने सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातून कधी माघार ?
सप्टेंबरचा पहिला आठवडा हलका ते मध्यम पावसाचा आहे. मात्र, परतीचा मान्सून सुरू होताच काहीसा वेग वाढेल. त्यामुळे सप्टेंबरचा शेवटचा आठवडा किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तो महाराष्ट्रातून प्रस्थान ठेवेल, असा अंदाज आहे.
मान्सूनची सद्यस्थिती कशी?
समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सध्या वाढले असून, प्रशांत महासागरावर तीव्र एल निनोची परिस्थिती आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही परिस्थिती आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.
आयओडी अर्थात भारतीय समुद्री स्थिरांक हिंदी महासागरावर तटस्थ असून, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातच तो सकारात्मक होण्याची शक्यता आहे.