

यवत: बोरीऐंदी (ता. दौंड) येथे घरात घुसून २३ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने चारचाकी वाहनातून घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साहिल मोहम्मद तांबोळी, मोहम्मद तांबोळी, कैफ शेख आणि अब्दुल शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, संबंधित तरुणी उरुळी कांचन येथे संगणक वर्गासाठी जात होती. काही काळापूर्वी साहिल तांबोळी आणि त्याचे दोन मित्र तिचा पाठलाग करून त्रास देत असल्याची माहिती तिने कुटुंबीयांना दिली होती. त्यानंतर तरुणीच्या वडिलांनी साहिलच्या वडिलांची भेट घेऊन मुलाला समज देण्याची विनंती केली होती. त्यावेळी पुन्हा त्रास होणार नाही, असे आश्वासन देण्यात आल्याने पोलिसांत तक्रार करण्यात आली नव्हती.
दरम्यान, दि. ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तरुणी आपल्या वडील आणि भावासोबत घरात असताना आरोपी जबरदस्तीने घरात घुसले. यातील दोघांकडे लोखंडी कोयते, तर अन्य दोघांकडे लाकडी काठ्या होत्या. आरोपींनी घरात प्रवेश केल्यानंतर धमकावले.
यावेळी एका आरोपीने कोयत्याचा धाक दाखवून कपाटातील घरखर्चासाठी ठेवलेली २५ हजार रुपयांची रोकड घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर तरुणीला जबरदस्तीने घराबाहेर नेऊन कारमध्ये बसवून घेऊन गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तरुणीच्या वडिलांनी आणि भावाने या प्रकाराला विरोध केला असता त्यांना लाकडी काठ्यांनी मारहाण केली. घटनेनंतर कुटुंबीयांनी परिसरात तरुणीचा शोध घेतला; मात्र, ती सापडली नाही. त्यानंतर त्यांनी यवत पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यवत पोलिसांनी तक्रारीच्या आधारे चौघांविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तसेच तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास व कारवाई सुरू आहे.